पुणे : पुणेकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिल्याने महापाैर, स्थायीसह इतर विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली असून या पदांसाठी चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे महापालिकेतील भाजपच्या गट नेतेपदी ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक गणेश बिडकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची माळ पुन्हा एकदा बिडकर यांच्या गळ्यात पडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले आहेत. शहराचे महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाले असून नवीन महापौर आणि उपमहापौर यांची निवड ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच भाजपच्या नवनियुक्त नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये महापौर, उपमहापौर, सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष व इतर पदांबाबत प्राथमिक चर्चा झाली. या चर्चेच्या माध्यमातून कोणत्या पदासाठी कोण इच्छुक आहे, याचा अंदाज घेण्यात आला. इच्छुकांची नावे कोअर कमिटी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविली होती. या नावांवर चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेणार आहे.
दरम्यान, भाजपच्या गट नेतेपदी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पत्र महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यामुळे बिडकर हे पुन्हा एकदा सभागृहनेते होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बिडकर हे सर्वांत अनुभवी नगरसेवक असून, ते पाचव्यांदा महापालिका सभागृहात पोहोचले आहेत. बिडकर यांनी यापूर्वी शहर सुधारणा समिती, स्थायी समितीचे अध्यक्षपदासह सभागृह नेतेपदही सांभाळले आहे. त्या अनुभवाच्या जाेरावर त्यांना पुन्हा संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली होती. त्यावेळी भाजपने नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांना अडीच वर्षे सभागृह नेतेपदाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर सध्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना सभागृह नेतेपदी एक वर्ष संधी मिळाली. यानंतर महापालिका निवडणुका आणि भविष्यातील महापालिकेचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपने घाटे यांच्याकडे सभागृह नेतेपद काढून बिडकर यांना दिले होते. पुढील दीड वर्षे बीडकर यांनी सभागृह नेतेपद सांभाळले. या काळात नदी सुधार प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालय यांसारख्या योजनांना मंजुरी मिळाली. नुकतीच पुणे महापालिकेची झालेली निवडणूक बिडकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. त्यामुळे बिडकर यांना पुन्हा संधी दिली.
भाजपमध्ये इतर पदांसाठी हाेणार चुरस !
सत्ताधारी भाजपने बिडकर यांची पक्षाचा गटनेता म्हणून निवड झाल्याने सभागृह नेतेपदाचा प्रश्न निकाली निघाला आहे. मात्र, महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व इतर विषय समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी चुरस निर्माण झाली असून इच्छुकांकडून वरिष्ठांकडे फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रिपाइंच्या स्वतंत्र गटाची नोंदणी होणार का?
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि आठवले गटाच्या रिपाइंने युती केली होती. रिपाइंचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढले होते. निवडणुकीमध्ये रिपाइंच्या जिंकलेल्या नगरसेवकांच्या गटाची विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गटनोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर भाजपने रिपाइंला उपमहापौरपद दिले होते. यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्येही भाजप व रिपाइं एकत्र लढले. रिपाइंचे उमेदवार कमळ या चिन्हावरच लढले. आता निवडून आलेल्यांची स्वतंत्र गटनोंदणी करून उपमहापौरपद देण्याची मागणी रिपाइंकडून केली जात आहे. मात्र, भाजपने विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये भाजप व रिपाइंच्या सर्व ११९ नगरसेवकांच्या गट नोंदणीचा उल्लेख आहे. त्यामुळे रिपाइंच्या स्वतंत्र गटाची नोंदणी होणार का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Pune BJP sees intense competition for mayor, committee posts after election win. Ganesh Bidkar re-appointed as group leader. Core committee forwards names to CM for final decision. RPI seeks separate group registration.
Web Summary : चुनाव जीतने के बाद पुणे भाजपा में महापौर, समिति पदों के लिए तीव्र प्रतिस्पर्धा है। गणेश बिडकर समूह नेता के रूप में फिर से नियुक्त। कोर कमेटी ने अंतिम निर्णय के लिए सीएम को नाम भेजे। आरपीआई अलग समूह पंजीकरण चाहती है।