पुणे - भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकला; उड्डाण रद्द, विमानतळावर कुत्रे, बिबट्या, पक्षी वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:31 IST2025-08-07T12:30:07+5:302025-08-07T12:31:03+5:30
गेल्या ४ महिन्यांपासून पुणे विमानतळावर वारंवार कुत्रे, बिबट्या आणि पक्षी येण्याचे प्रमाण वाढल्याने पुणे विमानतळावर पक्षी धडकण्याचा १२ घटना घडल्या आहेत

पुणे - भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकला; उड्डाण रद्द, विमानतळावर कुत्रे, बिबट्या, पक्षी वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर
पुणे : पुणेविमानतळावरून भुवनेश्वरला उड्डाणाच्या तयारीत असलेल्या (एआय १०९८) या विमानाला बुधवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान पक्षी (बर्ड हिट) धडकला. यामुळे विमानाच्या एका बाजूचे पाच ब्लेड निकामी झाल्या. पायलटला वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे विमान उड्डाण रद्द करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून विमानतळावर वारंवार या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेसचे पुणे ते भुवनेश्वर (एआय १०९८) विमान नियोजित वेळी सायंकाळी ४.०५ वाजता उड्डाणाच्या तयारीत होते. यामध्ये दीडशेहून जास्त प्रवासी होते. उड्डाणासाठी विमान धावपट्टीवरून उड्डाणासाठी वेग पकडल्यानंतर विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनला बर्ड हिट झाला. पायटलच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ विमानाचे उड्डाण थांबवले. याबाबतची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. विमान उड्डाणानंतर हा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बर्ड हिटमध्ये घटनेमुळे प्रवासी घाबरले होते. घटना गंभीर असल्यामुळे विमान धावपट्टीवरून पुन्हा पार्किंग-बेमध्ये आणण्यात आले. या घटनेमुळे पुणे विमानतळावरील प्रवासी सुरक्षेचा पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुघर्टना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सात महिन्यांत १२ घटना
गेल्या चार महिन्यांपासून पुणे विमानतळावर वारंवार कुत्रे, बिबट्या आणि पक्षी येण्याचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते ६ ऑगस्टपर्यंत पुणे विमानतळावर पक्षी धडकण्याचा १२ घटना घडल्या आहे. तसेच विमानतळ परिसरात मोर दिसणे, कुत्र्यांचा वावर यामध्ये वाढ झाली आहे. तरीही विमानतळ प्रशासन काही उपाययोजना करताना दिसत नाही. अशा घटना घडू नये यासाठी महापालिका, हवाई दल आणि विमानतळ प्रशासनाकडून एकत्रितपणे काम होण्याची आवश्यकता आहे. पण, या घटनेवरून या सर्व यंत्रणा कमी पडत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. हवाई दल, एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया व पुणे मनपा या यंत्रणांनी आता तरी सुरक्षित विमानतळ पर्यावरणाच्या गरजेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देऊन अशा घटना घडू नयेत, यासाठी एकसंध व समन्वयाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
विमानाला पक्षी धडकल्याच्या घटनेविषयी मला माहिती नाही. याविषयी माहिती घेतो आणि नंतर बोलतो. - संतोष ढोके, विमानतळ संचालक
विमानतळावर आज परत विमानास पक्षी धडकण्याच्या घटनेत सुदैवाने पुन्हा एकदा मोठा अपघात टळला आहे. गेल्या काही दिवसांत पक्षी व प्राणी धडकण्याची मालिका सुरू असूनही संबंधित यंत्रणांकडून विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना झालेली नाही असेच या घटनेवरून वाटते. प्रवासी व विमान सुरक्षिततेसाठी हे अत्यंत गंभीर आहे. वारंवार अशा घटना घडणे म्हणजे हवाई सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा अपुरी ठरत असल्याचे चिंताजनक लक्षण आहे. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ