Pune: मतदान यंत्राच्या गोदामात वाजला अलार्म; तांत्रिक बिघाड दुरूस्त, प्रशासनाचे स्पष्टीकरण

By नितीन चौधरी | Published: March 8, 2024 06:47 PM2024-03-08T18:47:54+5:302024-03-08T18:48:33+5:30

सासवड येथे मतदान यंत्राची चोरी झाल्यानंतर अशा घटनांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे....

Pune: Alarm goes off in voting machine warehouse; Technical fault correction, administration clarification | Pune: मतदान यंत्राच्या गोदामात वाजला अलार्म; तांत्रिक बिघाड दुरूस्त, प्रशासनाचे स्पष्टीकरण

Pune: मतदान यंत्राच्या गोदामात वाजला अलार्म; तांत्रिक बिघाड दुरूस्त, प्रशासनाचे स्पष्टीकरण

पुणे : ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आलेल्या कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामाच्या फायर अलार्ममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रक्रार गुरुवारी (दि. ७) उघड झाला. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ याची माहिती प्रशासनाला दिली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा बिघाड दुरूस्त करण्यात आला असून सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. सासवड येथे मतदान यंत्राची चोरी झाल्यानंतर अशा घटनांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यासाठी प्रथमस्तरीय तपासणी झालेले ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास या गोदामातील फायर अलार्ममध्ये बिघाड होऊन सायरन अचानक वाजण्यास सुरूवात झाली. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ याची माहिती प्रशासनाला दिली आणि अग्निशमन सिलेंडर्स तिथे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन वाहनही मागविण्यात आले. गोदामाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासणीनंतर तंत्रज्ञांनी फायर अलार्ममधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराची माहिती तत्काळ निवडणूक आयोगाला पाठविण्यात आली व बिघाड दुरुस्त करण्यासाठी परवानगी घेण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडेदहा वाजता राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या समक्ष गोदाम उघडण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. गोदमाच्या आतील सर्व यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करून बिघाड दुरुस्त करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणदेखील करण्यात आले असून याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बाबी संदर्भात अहवाल मागविण्यात आला असून तो प्राप्त होताच अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने आवश्यक खबरदारीच्या अतिरिक्त उपाययोजना करण्यात येतील असे जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गोदामात अग्निशमन यंत्रणा आहे आणि कडक सुरक्षा व्यवस्थादेखील आहे. तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या प्रकाराची माहिती प्रशासनाने निवडणूक आयोगाला दिली असून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमक्ष आवश्यक दुरूस्ती करण्यात आली आहे. सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत आहे. ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

Web Title: Pune: Alarm goes off in voting machine warehouse; Technical fault correction, administration clarification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.