सेवा देण्यात पुणे विमानतळाचा दर्जा २ गुणांनी सुधारला; ५९ स्थानांवरून ५७ व्या स्थानी झेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:18 IST2025-07-28T17:18:03+5:302025-07-28T17:18:18+5:30
सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळाचा दर्जा सुधारला असून, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांपेक्षा २ अंकांनी झेप घेतली आहे.

सेवा देण्यात पुणे विमानतळाचा दर्जा २ गुणांनी सुधारला; ५९ स्थानांवरून ५७ व्या स्थानी झेप
पुणे : लोहगाव विमानतळावरविमान प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांच्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाचा दर्जा सुधारत आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील विमानतळावरील सुविधेबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरण व ‘एसीआय-एएसक्यू’ (एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी) यांनी अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळाचा दर्जा सुधारला असून, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांपेक्षा २ अंकांनी झेप घेतली आहे.
पुणे विमानतळावर नव्या टर्मिनल सुरू झाल्यामुळे विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. शिवाय प्रवासी सुविधांच्या बाबतीतला दर्जाही सुधारला आहे. देशांतील व्यस्त विमानतळामध्ये पुणे विमानतळाचा समावेश आहे. दुसरीकडे प्रवाशांना सेवा देण्यामध्ये पुणे विमानतळावर सुधारणा होत आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे.
विमानतळावर प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांवर आधारित भारतीय विमानतळ प्राधिकरण व ‘एसीआय-एएसक्यू’कडून सर्वेक्षण केले जाते. यावेळी प्रवाशांची मते जाणून घेतली जाते. विमानतळावर मिळणाऱ्या एकूण ३१ सुविधांचे ‘एसीआय-एएसक्यू’कडून सर्वेक्षण करून विविध निष्कर्षांच्या आधारे तपासणी केली जाते. जानेवारी ते मार्च २५ च्या तिमाहीत पुणे विमानतळ सेवा गुणवत्तेत ५९ व्या स्थानी होते. मात्र, एप्रिल ते जूनच्या तिमाही सर्वेक्षणात पुणे विमानतळ ५७व्या स्थानी पोहोचले आहे. ही बाब प्रवाशांसाठी आनंदाची बाब आहे.
सेवा गुणवत्ता निर्देशांकात हे आहेत निकष...
- स्वच्छतागृहाची स्थिती
- विमानतळावर प्रवास करताना गेटवर लागणारा वेळ
- रेस्टाॅरंट आणि शाॅपिंग माॅलमधील कर्मचाऱ्यांकडून मिळणारा वागणूक
- टर्मिनलमधील स्वच्छता
- चेक इन व सेक्युरिटी काऊंटरमध्ये प्रवाशांना मिळणारी सेवा
- कर्मचाऱ्यांकडून विमान प्रवाशांना मिळणारी वागणूक
- याशिवाय इतर २६ निकषांद्वारे गुणवत्ता तपासली जाते.
विमानतळावरून प्रवास करताना हवाई प्रवाशांचा अनुभव हा त्यांना मिळालेल्या सेवेने संस्मरणीय ठरत असतो, यासाठी एअरलाइन्स आणि विमानतळावरील इतर यंत्रणांकडून तत्पर, सौजन्यशील व कार्यक्षम सेवा-सुविधा सातत्याने मिळणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. बहुतेक सेवा-निकषांवर पुणे विमानतळाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे, ही बाब निश्चितच दिलासादायक आहे. -धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ