Pune Airport : ‘इंडिगो’ची विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय; क्रू टंचाईमुळे २५ ते ३० विमाने रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:21 IST2025-12-05T15:20:56+5:302025-12-05T15:21:47+5:30
- उत्तर भारतातील धुकं आणि विमानांच्या देखभाल कामांची भर पडल्याने विमानतळावर अक्षरशः गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. इंडिगोच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी ताशेरे ओढले.

Pune Airport : ‘इंडिगो’ची विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय; क्रू टंचाईमुळे २५ ते ३० विमाने रद्द
पुणे : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा विस्कळीत झाले आहे. गुरुवारी पुण्यातून दिल्ली, कोलकाता, बंगळुरूसह इतर शहरातून ये-जा करणाऱ्या इंडिगोच्या २५ ते ३० विमाने ‘केबिन क्रू’ व इतर तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आले. त्यातच उत्तर भारतातील धुकं आणि विमानांच्या देखभाल कामांची भर पडल्याने विमानतळावर अक्षरशः गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. इंडिगोच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी ताशेरे ओढले.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून विमानांच्या वेळापत्रकात मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत इंडिगोच्या उड्डाणांच्या मोठ्या प्रमाणात विलंब आणि रद्द होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यासाठी इंडिगोकडून नवीन लागू झालेली पायलट ड्यूटी नियमावली, विश्रांतीबाबतचे सुधारित नियम, क्रूची कमतरता, तांत्रिक बिघाड, विमानतळांवरील ट्रॅफिक कंजेशन, चेक-इन प्रणालीतील अडचणी, प्रतिकूल हवामान, तांत्रिक समस्या आणि इतर ऑपरेशनल बाबी यासारखी अनेक कारणे देण्यात आली आहेत. बुधवारी नागपूर, चेन्नई, दिल्ली, अमृतसर, अहमदाबाद, कोलकाता आणि रांची ही आठ विमान सेवा रद्द करण्यात आली असताना गुरुवारी (दि. ४) याच मार्गावरील दहा ते बारा विमाने मध्यरात्रीपासून रद्द करण्यात आली आहेत, तर काही विलंबाने सोडण्यात उड्डाण केले. शिवाय प्रवाशांना लगेच वेळत न मिळाल्याने दोन ते तीन तास शोधावे लागले. थंडीमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांच्या या तुटवड्यामुळे विमान प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
इंडिगोची ‘क्रू टंचाई’ ठरली मोठी डोकेदुखी
देशातील सर्वात मोठी विमानसेवा असलेल्या इंडिगोला गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षित क्रूची मोठी कमतरता भेडसावत असल्याचे उघड झाले आहे. क्रू ड्यूटीबाबत तासांचे नियम कडक असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना उड्डाणांवर तैनात करता येत नाही. परिणामी, उड्डाणे रद्द व तासन् तास विलंबाने आहे. यामुळे कनेक्टिंग फ्लाइट्स चुकत आहेत. या सगळ्यांमुळे अनेकांना अतिरिक्त खर्चही करावा लागत आहे. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर थेट एअरलाइन्सला जाब विचारला आहे.
लगेज घेण्यासाठी चार तास वेटिंग
प्रवाशांना विमानासाठी आठ ते दहा तास थांबल्यानंतर विमान रद्द झाल्याचे समजल्यानंतर प्रवाशांची चिडचिड झाली होती. त्यानंतर प्रवासी त्यांचे लगेज घेण्यासाठी गेल्यानंतर विमान कंपनीने कशाही पद्धतीने प्रवाशांची लगेज टाकून दिली होती. त्यामुळे लगेज शोधण्यासाठी प्रवाशांना दोन ते चार तास फिरावे लागत होते. यामध्ये प्रवाशांची प्रचंड चिडचिड झाली. काही प्रवाशांना आपत्कालीन स्थितीमुळे घरी जायचे होते; पण विमान रद्द झाल्यामुळे त्यांना काय करावे, हे सुचत नव्हते. काही महिला विमानतळावर रडताना दिसत होत्या, अशी माहिती प्रवाशांनी दिली.
प्रवाशांच्या मदतीसाठी विमानतळ प्रशासनाकडून मदत करण्यात आली. तसेच कोणत्याही पदार्थांचे दर वाढवू नये, अशा सूचना देण्यात आले. शिवाय सीआयएसएफ जवान प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र सज्ज होते. - संतोष ढोके, विमानतळ संचालक