मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; पुणे विमानतळावरून दुबई, अबुधाबी उड्डाणे रद्द; प्रवाशांची मोठी गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 10:16 IST2026-03-05T10:15:51+5:302026-03-05T10:16:03+5:30
- पर्यटनासह व्यवसायानिमित्त दुबईहून पुण्यात आलेल्या आणि पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; पुणे विमानतळावरून दुबई, अबुधाबी उड्डाणे रद्द; प्रवाशांची मोठी गैरसोय
पुणे : लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबी, दुबईसाठी होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे बुधवारी (दि. ४) रद्द करण्यात आली. मध्यपूर्व आशिया देशात सुरू झालेल्या युद्धामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मागील पाच दिवसांपासून ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटनासह व्यवसायानिमित्त दुबईहून पुण्यात आलेल्या आणि पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, दुबईमध्ये अबुधाबी, कुवेत यासह अन्य परिसरात अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांना परत आणण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू असून, मागील २४ तासांत दोन विमानांतून प्रवाशांना मुंबईत सुखरूप आणण्यात आले.
मुंबई विमानतळावर येताच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, अजूनही काही अडकलेल्या प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी (दि. ४) पुणे-दुबई-पुणे ही विमानसेवा रद्द करण्यात आली असून, पुढील सूचना येईपर्यंत ही विमानसेवा बंद राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी खात्री करूनच तिकीट काढावे, असे आवाहन विमान कंपन्यांकडून करण्यात आले आहे.