Pune air quality: वायुप्रदूषणात भर घालणारे आरएमसी आणि हॉटमिक्स प्रकल्प पुणे शहराबाहेर हलवावेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 10:23 IST2026-04-10T10:23:17+5:302026-04-10T10:23:43+5:30
pune air quality news - वडगाव परिसरात सुरू असलेल्या आरएमसी प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने त्यावर कारवाई करावी.

Pune air quality: वायुप्रदूषणात भर घालणारे आरएमसी आणि हॉटमिक्स प्रकल्प पुणे शहराबाहेर हलवावेत
पुणे : शहराच्या वायुप्रदूषणात भर घालणारे खासगी, तसेच महापालिकेचे रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी) आणि डांबर (हॉटमिक्स) प्रकल्प हे शहराबाहेर हलवावेत, यासाठी महापालिका आणि खासगी प्रकल्प व्यावसायिकांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिल्या आहेत.
वडगाव परिसरात सुरू असलेल्या आरएमसी प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने त्यावर कारवाई करावी. दाट लोकसंख्येच्या ठिकाणी असलेले हे प्रकल्प हलवावेत, असा प्रस्ताव भाजप नगरसेवक हरिदास चरवड यांनी स्थायी समितीला दिला होता. यावर गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेले आरएमसी, तसेच डांबर प्रकल्पावर तातडीने कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले.
तसेच नजीकच्या काळात शहराच्या हद्दीवर लोकसंख्या कमी असलेल्या भागांमध्ये हे प्रकल्प हलवावेत. महापालिकेचा देखील येरवडा येथे डांबर प्रकल्प आहेत. हे प्रकल्प देखील शहराच्या हद्दीवरील चार कोपऱ्यांमध्ये विभागण्यात यावेत, यासाठी जागांचा शोध सुरू असून शिंदेवाडी जकात नाका आणि वाघोली येथील जागेत पुढील सहा महिन्यांत प्रकल्पाची कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे भिमाले यांनी सांगितले.