प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सेन्सर आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:37 IST2025-08-28T10:37:21+5:302025-08-28T10:37:53+5:30
- महापालिकेची बांधकाम व्यावसायिकांना सूचना

प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सेन्सर आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली
पुणे :महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सरवर आधारित वायू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारणे आवश्यक आहे. त्यानुसार बांधकामांच्या ठिकाणी होत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी या प्रकल्पाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली उभारण्याची सूचना महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना केली आहे. त्यामुळे आता बांधकामांच्या ठिकाणी किती वायू प्रदूषण होत आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे ‘रिअल टाइम डेटा’ उपलब्ध होणार असून, धूळ व वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करता येणार आहे.
डब्ल्यूआरआय इंडियाचे संचालक श्रीकुमार कुमारस्वामी यांनी सेन्सर आधारित वायू गुणवत्ता तपासणीबाबत सादरीकरण केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पर्यावरण विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर आदी उपस्थित होते.
राज्यातील अनेक शहरांमध्ये पीएम २.५ आणि पीएम १० या धुलीकणांमुळे वायू प्रदूषण वाढत असल्याने राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्रदूषणाची पातळी निर्देशित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयक समस्या कमी करण्यासाठी बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार काम करण्याचे आवाहन करण्यात आले. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी किती प्रदूषण होते, याचा अंदाज यावा, यासाठी सेन्सर आधारित प्रणाली बसविण्याच्या सूचना केल्या आहेत.
सेन्सर आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधितांच्या सूचना व शिफारसींचा समावेश करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करून बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारून डॅशबोर्डशी संलग्न करावी, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी केली.
पुणे शहर हे राहण्यायोग्य शहर आहे; परंतु सद्य:स्थितीत बांधकाम क्षेत्र व रस्त्यावरील धुळीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी तातडीने सेन्सर आधारित वायू गुणवत्ता प्रणाली कार्यान्वित करावी. - प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका