Pune Accident News: पुण्यातील अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या या अपघातात वाहनांची वाट बघणारे थोडक्यात बचावले. एक महिला आणि एका पुरूषाने महामार्गावर कारला थांबवण्यासाठी हात दाखवला. कार थांबली पण त्यानंतर जे घडले, त्यामुळे दोघांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बुधवारीच या ठिकाणी एका वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना उरूळी कांचन येथील आहे असून, पुणे-सोलापूर महामार्गावर घडली आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या अपघातात एक महिला आणि पुरुष महामार्गावर उभे असल्याचे दिसत आहे.
महिला कारला हात दाखवते. कार त्यांच्याजवळ येऊन उभी राहते. पुरूष चालकांकडे चौकशी करत असतानाच पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, कार रस्त्याच्या खाली फेकली गेली. तर कारला लागून उभे असलेले दोघे थोडक्यात बचावले. या अपघाताने घाबरलेले दोघे नंतर रस्त्याच्या बाजूला धावले.
पुणे अपघात व्हिडीओ बघा
टेम्पोने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू
उरूळी कांचन येथील तळवाडी चौकात बुधवारी भीषण अपघाताची घटना घडली होती. गावी निघालेल्या आणि चौकात वाहनांची वाट बघत असलेल्या प्रवाशांना टेम्पोने उडवले. पुणे-सोलापूर मार्गावरून जाणाऱ्या टेम्पोने सहा जणांना चिरडले. घटनेनंतर चालक फरार झाला.
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले. अशोक भीमराव, मेहबूब रहमान मियाडे या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला.