Pune Accident : उड्डाणपुलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 20:07 IST2025-08-06T20:06:15+5:302025-08-06T20:07:00+5:30
दुचाकीस्वार प्रणव याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातात प्रणव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला.

Pune Accident : उड्डाणपुलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
पुणे : पौड फाटा चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला, तर अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला आहे. प्रणव गणेश पालकर (२०, रा.बावधन) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अथर्व अनिल वैद्य (१९, रा.सवाना हाउसिंग सोसायटी, वाघोली) जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्रणव पालकर आणि त्याचा मित्र अथर्व वैद्य हे शनिवारी (दि. २) पहाटे साडेतीनच्या सुमारास पौड फाटा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरून भरधाव वेगात निघाले होते. त्यावेळी दुचाकीस्वार प्रणव याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातात प्रणव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला.
अपघाताची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी अवस्थेतील प्रणव आणि त्याचा मित्र अथर्व याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचाराच्या दरम्यान प्रणव याचा रुग्णालयात मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांंनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताच्या घटनेची नोंद कोथरुड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. उपनिरीक्षक शेख या पुढील तपास करत आहेत.