पंढरपूरहून देवदर्शन करुन निघाले,पण घरी पोचलेच नाहीत;टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 14:47 IST2025-07-06T14:46:23+5:302025-07-06T14:47:16+5:30
- पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव टँकरने जोरदार धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.

पंढरपूरहून देवदर्शन करुन निघाले,पण घरी पोचलेच नाहीत;टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भिगवण : पंढरपूरहून देवदर्शन करून गावाकडे परतत असलेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव टँकरने जोरदार धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवारी (दि. ६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घडला.
मृताचे नाव मल्हारी बाजीराव पवार (वय ५७, व्यवसाय शेती, रा. येळपणे पोलीस वाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे असून, त्यांची पत्नी पंखाबाई मल्हारी पवार (वय ५०) या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर भिगवणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पवार दांपत्य (एमएच १६ एजी २३४३ क्रमांकाची दुचाकी) पंढरपूरहून गावाकडे परतत असताना मागून आलेल्या अज्ञात टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात मल्हारी पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक वाहन घेऊन फरार झाला असून, पोलीस त्या अज्ञात टँकरचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.