उतारवयात हक्काचा साथीदार..! पुण्यात ९० ज्येष्ठांची लगीनगाठ बांधण्याचा स्तुत्य उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:00 IST2025-03-16T11:59:09+5:302025-03-16T12:00:15+5:30
- कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करत संस्थेच्या माध्यमातून ९० ज्येष्ठ नागरिकांनी पुनर्विवाह केला आहे.

उतारवयात हक्काचा साथीदार..! पुण्यात ९० ज्येष्ठांची लगीनगाठ बांधण्याचा स्तुत्य उपक्रम
पुणे : उतारवयात साथीदाराची गरज अधिक तीव्र होते. मात्र, पती किंवा पत्नीच्या निधनानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक एकाकी जीवन जगतात. या परिस्थितीला सकारात्मक मार्ग देण्यासाठी माधव दामले यांच्या ‘हॅप्पी सीनियर’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करत संस्थेच्या माध्यमातून ९० ज्येष्ठ नागरिकांनी पुनर्विवाह केला आहे. काही जणांनी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’चा पर्याय निवडला आहे.
१२ वर्षांपासून ज्येष्ठांसाठी कार्यरत
माधव दामले सांगतात, “गेल्या १२ वर्षांपासून आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत आहोत. उतारवयात एकटे राहण्याऐवजी आनंदी जीवन जगता यावे, यासाठी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ संकल्पना आम्ही मांडली. समाज काय म्हणेल, या विचाराने अनेक ज्येष्ठ पुनर्विवाहाचा निर्णय घेत नाहीत. त्यामुळे ‘लिव्ह-इन’ हा त्यांच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.”
संस्थेच्या माध्यमातून मजबूत व्यवस्था
२०१२ मध्ये ‘हॅप्पी सीनियर’ संस्थेची स्थापना करण्यात आली. इच्छुक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ठरावीक नियमावली बनवण्यात आली आहे. यामध्ये व्यक्तिगत माहिती, वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक पुरावे यांची पडताळणी केली जाते. महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ठरावीक अनामत रक्कम ठेवण्याचा नियम करण्यात आला आहे.
संस्था दर महिन्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलीचे आयोजनही करते. त्यामुळे या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना नव्याने आनंदी जीवनाची संधी मिळत आहे.