राजगुरूनगर, पुणे: पुण्याच्या राजगुरूनगरमधील आडगाव येथील १५ वर्षाच्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सर्पदंशानंतर तिला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी (१६ मे २०२५) सकाळी घडली.
प्राजंल गोपाळे (वय, १५) असे सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या मुलीची नाव असून ती इयत्ता अकरावीत शिकत होती. दरम्यान, शुक्रवारी ९ वाजताच्या सुमारास प्रांजल जनावरांसाठी वळईमधुन चारा काढताना तिला सर्पदंश झाला. त्यानंतर घरच्यांनी तात्काळ ताबडतोब खाजगी वाहनाने पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु, तिथे डॉक्टर नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यानंतर १०.३० वाजताच्या सुमारास प्रांजलला चांडोली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तिच्यावर प्रथामिक उपचार केले. परंतु, विषाची मात्रा पहाता अशा रुग्णाला आयसीयूची गरज असल्याने तिला वायसीएम मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पंरतु, वाटेतच तिचा मृत्यू झाला.
प्रांजलला वेळत उपचार मिळाले असते तर, कदाचित तिचा जीव वाचला असता, असा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. याबाबत तालुका वैद्यकीय डॉ. विलास माने यांच्याशी चर्चा केली असता पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात संबंधित रुग्ण आला नसल्याचा त्यांनी दावा केला.