साहित्य संमेलनातून प्रकाशकांना बगल?; महामंडळाची प्रकाशकांबाबतची भूमिका उदासिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:35 PM2018-01-01T16:35:33+5:302018-01-01T16:42:33+5:30

अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर दर वर्षी एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सत्कार केला जातो. मात्र, महामंडळ नागपूरला गेल्यानंतर या प्रथेला काही प्रमाणात बगल देण्यात आली आहे.

The publisher beside the literature gathering ?; The role of the mahamandal about publisher is apathetic | साहित्य संमेलनातून प्रकाशकांना बगल?; महामंडळाची प्रकाशकांबाबतची भूमिका उदासिन

साहित्य संमेलनातून प्रकाशकांना बगल?; महामंडळाची प्रकाशकांबाबतची भूमिका उदासिन

Next
ठळक मुद्देमहामंडळाने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेत बदल करु नये : अरुण जाखडेग्रंथप्रदर्शन हे केवळ विक्रीसाठी नसते, वाचकांनी येऊन पुस्तके पाहावीत, हा हेतू : श्रीपाद जोशी

पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर दर वर्षी एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सत्कार केला जातो. मात्र, महामंडळ नागपूरला गेल्यानंतर या प्रथेला काही प्रमाणात बगल देण्यात आली आहे. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनापासून प्रकाशकाऐवजी प्रकाशन व्यवसायाशी संबंधित व्यक्तीचा सन्मान केला जात आहे. महामंडळाची प्रकाशकांबाबतची भूमिका उदासिन झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रंथ प्रदर्शनाची जबाबदारी महामंडळाऐवजी प्रकाशकांनी उचलण्याच्या सूचनेचे यंदा काय होणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
प्रकाशन व्यवसाय हा साहित्य व्यवहाराचा अविभाज्य भाग असल्याने साहित्य संमेलनांमध्ये प्रकाशकांना दर वर्षी सामावून घेतले जाते. केवळ संमेलनांपुरतेच नव्हे; तर वर्षभर प्रकाशन वाङ्मययीन व्यवहाराशी संबंधित असतात. साहित्य संमेलनांमध्ये ग्रंथविक्रीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते, वाचनसंस्कृती जोपासली जाते. साहित्यिक आणि प्रकाशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलनामध्ये एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सन्मान करण्याची परंपरा चालत आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रकाशकांना या परंपरेतून डावलले जात असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे.
दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुण्यातून नागपूरला गेले. त्यानंतर डोंबिवलीतील संमेलनात लेखक म्हणून डॉ. जयंत नारळीकर यांचा सन्मान करण्यात आला. प्रकाशकाऐवजी प्रकाशनाशी संबंधित चेहरा अशी ओळख असलेले मुखपृष्ठाची दखल घेण्याच्या दृष्टीने बाळ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. बडोदा येथे होत असलेल्या आगामी ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लेखक श्याम मनोहर यांचा तर संपादक गंगाधर पानतवणे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाही प्रकाशक सन्मानापासून दूर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ग्रंथप्रदर्शनाचे साहित्य संमेलनातील वाटा मोलाचा असतो. प्रदर्शनाच्या निमित्ताने वाचक संमेलनाला हजेरी लावतात, पुस्तकांशी त्यांचा संबंध येतो. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथविक्री घटली होती. त्यावेळी ग्रंथप्रदर्शन हे केवळ विक्रीसाठी नसते, वाचकांनी येऊन पुस्तके पाहावीत, हा त्यामागचा हेतू असतो, असे मत महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले होते. घुमानच्या संमेलनात मराठी वाचकच संमेलनाचा येणार नसेल, तर पुस्तकांची विक्री कशी होणार, या मुद्दयावरुन प्रकाशकांनी संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. कालांतराने तो रद्द करण्यात आला. आगामी संमेलन बडोद्याला होत असताना प्रकाशकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशकांचा सन्मान केला जातो. महामंडळाच्या सभेमध्ये हा विषय चर्चिला जाणे आवश्यक आहे. महामंडळात एखादी व्यक्ती स्वत:चा अजेंडा राबवणार असेल तर ते योग्य नाही. प्रकाशक हा साहित्यिकाशी सर्वात जवळचा घटक आहे. प्रकाशन वर्षभर वाङ्मययीन व्यवहारात सहभागी होतात. शासनातर्फेही दरवर्षी प्रकाशकांना गौरवले जाते. महामंडळाने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेत बदल करु नये, असे वाटते.
- अरुण जाखडे, प्रकाशक

महामंडळातर्फे प्रकाशन विश्वाशी संबंधित विविध घटकातील मान्यवरांचा सत्कार केला जातो. केवळ प्रकाशक एवढ्याच एका वर्गवारीपुरते ते मर्यादित नाही. ग्रंथप्रदर्शन समिती महामंडळाने स्वतंत्रपणे नेमली असून ती आपले काम महामंडळाच्या निर्णयांप्रमाणे चोखपणे करते आहे. खरेतर ग्रंथ प्रदर्शनासाठी संमेलन संयोजकांनी केवळ जागा उपलब्ध करून देणे व प्रकाशकांच्या, वितरकांच्या व तत्सम व्यावसायिकांच्या सर्व संघटनांच्या महासंघाने त्यांच्यातल्या तज्ज्ञ व अनुभवी प्रतिनिधींना घेऊन हे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणे ही आदर्श व्यवस्थ असू शकते, तशी सूचना मी मागेही केली आहे. त्यावर कधीतरी विचार व्हावा.
- श्रीपाद जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

Web Title: The publisher beside the literature gathering ?; The role of the mahamandal about publisher is apathetic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे