By the change of constitution, alert | संविधान बदलाचे वारे, सावध होण्याचा इशारा

ठळक मुद्देराष्ट्रीय चर्चासत्रात उत्तम कांबळे

आॅनलाईन लोकमत
नागपूर : देशात संविधान बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गाफिल राहू नये, सावध व्हा, असा इशारा ठाणे येथे भरलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे दिला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, डॉ. आंबेडकर कॉलेजी दीक्षाभूमी आणि डॉ. मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीतील दादासाहेब कुंभारे सभागृहात राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ‘प्रा. वामन निंबाळकर व डॉ. ज्योती लांजेवार वाङ्मय लेखन व सामाजिक-सांस्कृतिक कर्तृत्व’ या विषयावर आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी होते. विचारवंत व समीक्षक डॉ. वि.स.जोग हे प्रमुख अतिथी होते. डॉ. आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार आणि पी.डब्ल्यू.एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी वामन निंबाळकर आणि ज्योती लांजेवार यांच्या कवितांवर प्रकाश टाकला. या दोन्ही व्यक्ती चळवळीतून आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या लेखणीला धार होती, असेही ते म्हणाले.
वि.स. जोग यांनी वामन निंबाळकर आणि ज्योती लांजेवार या आंबेडकरी-दलित कवितेतील वाघ असल्याचे स्पष्ट केले.
प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके यांनी भूमिका विषद केली. प्रा. रवींद्र तिरपुडे यांनी संचालन केले. प्रा. अमृता डोर्लीकर यांनी आभार मानले.
यावेळी पार पडलेल्या चर्चासत्रात डॉ. अजय देशपांडे, अशोक थूल, डॉ. सिद्धार्थ बुटले, डॉ. निशा शेंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रा. विकास सिडाम, डॉ. देवानंद खोब्रागडे, डॉ. मनिषा नागपुरे आणि डॉ. जलदा ढोके यांचा सहभाग होता.

आंबेडकरी-दलित साहित्याने पारंपरिक लेखनातून बाहेर पडावे
आंबेडकरी-दलित साहित्यात पारंपरिक लेखनच होत आहे. यातून आता बाहेर पडण्याची गरज आहे. दलितांनी आदिवासींवर, आदिवासींनी दलितांवर लिहिण्याची गरज आहे. जागतिकीकरणामुळे मोठे परिणाम होत आहे त्यावरही लिखाण होण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षाही उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.