संतोष देशमुख हत्याकांडाचा नीरेत निषेध, बाजारपेठेत दिवसभर बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 20:46 IST2025-03-08T20:45:14+5:302025-03-08T20:46:18+5:30
- आरोपींच्या फोटोंना जोडे मारो व निषेध सभा

संतोष देशमुख हत्याकांडाचा नीरेत निषेध, बाजारपेठेत दिवसभर बंद
नीरा : बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. यातील एक आरोपी आजही फरार असून इतर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याने तसेच या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा निषेध करण्यासाठी नीरा शहर परिसरातील गावातून उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोपींच्या फोटोंना जोडे मारत, निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नीरा येथे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या कारणास्तव निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या फोटोंना जोडे मारण्यात आले. नीरेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या निषेध सभेत नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, सदस्य प्रमोद काकडे, अनिल चव्हाण, दादा गायकवाड, ॲड. आदेश गिरमे, डॉ. दिनकर गायकवाड, महेश जेधे, राजेंद्र बरकडे, अजय सोनवणे, अमोल साबळे, वैभव कोंडे, कुलदीप पवार, सुरेंद्र जेधे, टी. के. जगताप, सचिन मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. निषेध सभेचे प्रमुख संयोजक मंगेश ढमाळ यांनी प्रास्ताविक केले. या निषेध सभेला नीरा पंचक्रोशीतील गावातील सर्व जाती, धर्मांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. संतोष देशमुख यांची मागील तीन महिन्यांपूर्वी निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. ही हत्या खंडणी वसुली प्रकरणातून झाल्याचे सिद्ध होत आहे. नव्वद दिवस झाले तरी आजही एक आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अटकेत असलेल्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे समोर येत आहे. हे सर्व निंदनीय असल्याचे मत नीरा येथील आंदोलक मंगेश ढमाळ यांनी मांडले.
कै. संतोष देशमुख यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्यासह सर्व आरोपींवर कडक कारवाई व्हावी तसेच मुंडे व कराड यांच्यावर हत्या, विधानसभा निवडणुकीतील दहशतवाद, खंडणी, जमिनी बळकावणे, अवैध उत्खनन, पीक विमा घोटाळा आणि अवैध संपत्ती यासंदर्भात गुन्हे दाखल व्हावेत. हत्या व इतर सर्व प्रकरणांतील खटले नि:पक्षपाती न्याय मिळण्यासाठी केज, जि. बीड येथून सातारा किंवा कोल्हापूर सत्र न्यायालयात हलविण्यात यावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे नीरा शहर प्रमुख टी. के. जगताप यांनी केली.
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी
बीड येथील आरोपींना पाठीशी घालणारे मंत्री धनंजय मुंडे यांचा निषेध करण्यासाठी नीरा शहर पिंपरे (खुर्द), निंबूत, गुळुंचे, कर्नलवाडी, राख, पिसुर्टी, जेऊर, मांडकी आदी गावांतून उत्स्फूर्तपणे बंद बंद पाळण्यात आला होता. सकाळी दहा वाजता निषेध सभा झाल्यावर आरोपींच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले.