अजित पवारांना बोलू न दिल्याचा निषेध; पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावरच भजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 18:06 IST2022-06-15T17:59:50+5:302022-06-15T18:06:41+5:30
रस्त्यावर बसून आणि कपाळाला काळं गंध लावून या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र भाजपचा निषेध नोंदवला

अजित पवारांना बोलू न दिल्याचा निषेध; पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावरच भजन
पुणे : संत तुकाराम महाराज पादुका चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाळ, ढोलकी वाजवत भजन कार्यक्रम केला. रस्त्यावर बसून आणि कपाळाला काळं गंध लावून या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र भाजपचा निषेध नोंदवला.
काल (ता. १४ जून) देहू संस्थान इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मात्र पंतप्रधान यांच्या भाषणाआधी अजित पवार यांचं भाषण न घेता देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी आंमंत्रित करण्यात आलं. पवार यांना भाषणासाठी नाकारण्यात आलं. ज्यानंतर पवार काही न बोलताच बसून राहिलेत. पंतप्रधान यांनी पवार यांच्या भाषणाची आठवण मंचावर करून दिली. मात्र स्वाभिमानाखातर पवार यांनी बोलण्यास नकार दिला. याच प्रकाराचा निषेध करत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भजनाचा कार्यक्रम पुण्यात घेतला.