ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षणातील अडचणी सोडवणार;मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 19:46 IST2020-12-19T19:46:16+5:302020-12-19T19:46:45+5:30
विद्यार्थ्यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाची समर्पक उत्तरे

ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षणातील अडचणी सोडवणार;मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
जेजुरी : ऑनलाइन शिक्षण पद्धतीत विद्यार्थी रस घेत आहेत. मात्र, नेट मिळत नसल्याने अडचणी येत होत्या. महा नेटमुळे मोफत कनेक्टिव्हिटी मिळाल्याने या अडचणी दुर होणार आहे, असे म्हणत पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत घेतली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.
ऑनलाइन शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने महानेटची मोफत सुविधा देण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबवला आहे. यातील महा नेट फेज २ चे उदघाटन शुक्रवारी दुपारी ३.३० ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी पाच जिल्ह्यातील पाच खेड्यातील शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावातील शाळेतील विद्यार्थ्यांशी व शिक्षकांनी त्यांनी संवाद साधला.
कुंभारवळण जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका शीतल खैरे जाधव यांनी विद्यार्थ्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झूम अँपद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीबाबत अडीअडचणी समजावून घेतल्या. कोरोना संकटात शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हनून ऑनलाइन व ऑफलाईन शिक्षण पद्धतीने शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नुसार शाळा शाळांमधून ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. ही शिक्षण पद्धतीला विद्यार्थ्यांचा किती प्रतिसाद मिळतो. विध्यार्थी यात रस दाखवतो का? यात नेमक्या अडचणी काय आहेत या विद्यार्थी व शिक्षकांकडून समजावून घेतल्या. यात येणाऱ्या अडचणी काय आहेत ते ही शिक्षकांनी शासनाकडे कळवाव्यात. जेणेकरून अजून काही बदल करता येतील. असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले.
ऑनलाइन शिक्षण पद्धतीत विध्यार्थी रस घेत आहेत. मात्र नेट मिळत नसल्याने अडचणी येत होत्या. महा नेट मिळे मोफत कनेक्टिव्हिटी मिळाली. याचा फायदा शिक्षक, विध्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी सर्वानाच होणार आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीने ग्रामीण भागातील विधर्थ्यांचा शैक्षणिक दर्जा नक्कीच उंचावणार आहे. मात्र नेट असले तरी अँड्रॉइड मोबाईल नसल्याने अडचणी आहेत. असे मोबाईल एका कुटुंबात एकच असतो, किंवा अनेकांकडे नाही. सर्व सामान्य कुटुंबाना प्रत्येकासाठी तो खरेदी करणे ही परवडणारे नाही. यामुळे इच्छा असून ही अनेक विध्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे अडचणीचे होत आहे, अशी माहिती शिक्षिका शीतल खैरे - जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी पुरंदरचे गट विकास अधिकारी अमर माने, गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, ग्रामस्थ, ग्रामसेवक, मंडळाधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
........
विद्यार्थ्यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाची समर्पक उत्तरे
मुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना विद्यार्थी व शिक्षकांनी समर्पक उत्तरे दिली. महा नेटची सुविधा खूप चांगली आहे. ही सेवा शासनाने ग्रामीण भागात सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने ऑनलाइन शिक्षण पद्धतीत हळूहळू आमूलाग्र बदल होईल याचा फायदा त्या त्या खेड्यांना होणार आहे. या सारख्या अद्ययावत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन ही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शीतल खैरे जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.