Pro Kabaddi League : प्रो कबड्डी स्पर्धेत गतविजेत्या पुणेरी पलटणचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 20:08 IST2024-12-21T20:07:47+5:302024-12-21T20:08:52+5:30

तेलुगु टायटन्सचा ४८-३६ असा विजय : पवन सेहरावत, विजय मलिक, आशिष नरवाल चमकले

Pro Kabaddi League Defending champions Puneri Paltan challenge in the Pro Kabaddi tournament ends | Pro Kabaddi League : प्रो कबड्डी स्पर्धेत गतविजेत्या पुणेरी पलटणचे आव्हान संपुष्टात

Pro Kabaddi League : प्रो कबड्डी स्पर्धेत गतविजेत्या पुणेरी पलटणचे आव्हान संपुष्टात

पुणे : पवन सेहरावत, विजय मलिकच्या खोलवर चढाया आणि त्यांना आशिष नरवालकडून मिळालेल्या अष्टपैलू साथीमुळे तेलुगु टायटन्सने प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वात गतविजेत्या पुणेरी पलटण संघाचा ४८-३६ असा पराभव केला. या विजयामुळे पुणेरी पलटण संघाला घरच्या मैदानावर आणखी एक पराभव पत्करावा लागला आणि यंदाच्या हंगामातील आव्हानही गमवावे लागले. तेलुगुने वियजासह ६६ गुणांसह बाद फेरीतील आव्हान कायम राखले.

पवन सेहरावतच्या खोलवर चढाया, विजय मलिकने निर्णायक चढाईत मिळविलेले बोनस गुण, आशिष नरवालच्या ताकदवान चढाया आणि बचावातील सतर्कता यामुळे तेलुटु टायटन्सने हंगामातील १२वा विजय मिळविला. एकही बरोबरी सामना न खेळणाऱ्या तेलुगुने १० पराभव पत्करले. गेल्या तीन हंगामात ११ विजय मिळविणाऱ्या तेलुगुने या एका हंगामात १२ विजय मिळविले. अखेरच्या दहाव्या हंगामात तर, त्यांना दोनच विजय मिळवता आले होते. पलटण संघात आज मोहित गोयतही नव्हता. आकाश शिंदेला १२व्या मिनिटालाच बदलावे लागले, पंकजला केवळ दोनच गुण मिळवता आले. अशा वेळी आर्यवर्धन नवलेच्या ८ गुणांचा त्यांना दिलासा मिळाला. कोपरारक्षक अमनने ५ गुणांची कमाई केली. पण, हे सगळे प्रयत्न पलटणसाठी फोल ठरले.

पुणेरी पलटणला या विजय आवश्यक असलेल्या सामन्यात पूर्वार्धात चमक दाखवता आली नाही. आकाश शिंदे, पंकज मोहिते हे प्रमुख चढाईपटू निष्प्रभ ठरले. आर्यवर्धन नवलेलाच पलटणकडून काय तो प्रतिकार केला. तुलनेत पुनरागमन केलेल्या पवन सेहरावतने लौकिक दाखवून देत तेलुगु टायटन्स संघाचे आव्हान राखले. पूर्वार्धातच त्याने अव्वल दहा गुणांची कमाई केली. आशिष नरवालनेही त्याला सुरेख साथ केली. अंकित आणि क्रिशन यांनी बचावपटू म्हणून आपली भूमिका चोख बजावल्यामुळे तेलुगु टायटन्सने मध्यंतराला २५-१६ अशी ९ गुणांची आघाडी मिळवली होती.

उत्तरार्धातही आर्यवर्धन नवलेच्या चढाईच्या जोरावर पलटणची झुंज कायम राहिली. उत्तारर्धाच्या सुरुवातीलाच चार मिनिटांत आर्यवर्धनच्या एका चढाईतील तीन गुणांमुळे पटलणला तेलुगुवर लोण चढवणे शक्य झाले. या लोणमुळे २३-२५ अशा भरून काढलेल्या पिछाडीचा फायदा पलटणला उठवता आले नाहीत. यामध्ये बचावफळीचे अपयश कारणीभूत होते. आघाडी भरून काढण्यासाटी नंतर विजय मलिकच्या बोनस गुणांचा फायदा तेलुगुला चांगला मिळाला. आघाडी वाढल्यावर आक्रमक होत तेलुगुने पलटणवर आणखी एक लोण चढवत आघाडी ३९-२८ अशी भक्कम केली. यानंतर दडपणाखाली पलटणची संघर्षाची मानसिकता देखिल संपुष्टात आली. तेलुगुने ही आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. 

Web Title: Pro Kabaddi League Defending champions Puneri Paltan challenge in the Pro Kabaddi tournament ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.