Ramzan Eid 2025: ईदसाठी पूर्वतयारीला वेग; बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा अन् शेवाईसाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:36 IST2025-03-27T13:30:16+5:302025-03-27T13:36:45+5:30

शिरखुर्म्याचा गोडसर सुगंध घरभर दरवळतो, तेव्हा ईदचा खरा उत्साह जाणवतो. हा पदार्थ केवळ घरातील सदस्यांसाठीच नव्हे, तर नातेवाईक, शेजारी आणि मित्रांसाठीही पाठवला जातो.

Preparations for Ramzan Eid Purchase of ingredients for Shirkhurma and Shewai begins in markets | Ramzan Eid 2025: ईदसाठी पूर्वतयारीला वेग; बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा अन् शेवाईसाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी सुरू

Ramzan Eid 2025: ईदसाठी पूर्वतयारीला वेग; बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा अन् शेवाईसाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी सुरू

पुणे : रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांच्या घरी खास बनविण्यात येणाऱ्या शिरखुर्म्याच्या तयारी वेग आला आहे. रमजान ईदच्या सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा आणि शेवाईसाठी लागणाऱ्या पदार्थांची जोरदार खरेदी सुरू आहे. किराणा दुकाने, सुके मेवे विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. दूध आणि सुकामेव्याचे दर किंचित वाढले असले तरी ईदच्या आनंदात त्याचा विशेष फरक जाणवत नाही. बहुतांश महिलांनी या वस्तू खरेदीही केल्या आहेत.

रमजान ईदचा खास मेन्यू म्हणजे शिरखुर्मा आणि शेवई हे दोन गोड पदार्थ ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लीम कुटुंबाच्या घरी बनवले जातात. कुटुंब किती मोठे, ईदच्या दिवशी किती पाहुणे घरी येणार आहेत आणि किती जणांच्या घरी शिरखुर्मा पाठवायचा आहे, यावरून शिरखुर्म्यासाठी किती सामान आणायचे, हे ठरवले जाते. काही घरांमध्ये तर १० ते १५ लीटर दुधाचा शिरखुर्मा बनविला जातो. बदाम, काजू, पिस्ता, खोबरे, खसखस, शेवया, खजूर, अंजीर, जर्दाळू, चारोळी असा सुकामेवा शिरखुर्म्यासाठी वापरण्यात येतो. अनेक घरांत आता या गोष्टींची खरेदी झाली असून, खोबरे किसून ठेवणे, बदाम, अंजीर आणि इतर सुकामेव्याचे तुकडे करून तळून ठेवणे, खजुरातील बिया काढणे अशा तयारीची लगबग घराघरांत सुरू झाली आहे. ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर शिरखुर्मा बनवावा लागत असल्यामुळे या गोष्टींची तयारी आठवडाभर आधीपासूनच सुरू होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही सुका मेवा आणि शेवया खरेदी केली आहे. ईदच्या दिवशी पाहुणे घरी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिरखुर्मा बनवावा लागत असल्याने आधीच तयारी करावी लागते. - शाकेरा शेख, ग्राहक.

शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आमच्याकडे मुबलक प्रमाणात आहेत. ग्राहकांना चांगल्या किमतीत साहित्य द्यायचा आमचा प्रयत्न असतो. – जुबेर खान, सुकामेवा विक्रेता.

नातेवाईक, शेजारी आणि मित्रांसाठी...

रमजान महिन्यात रोजा पूर्ण झाल्यानंतर ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिरखुर्म्याचा गोडसर सुगंध घरभर दरवळतो, तेव्हा ईदचा खरा उत्साह जाणवतो. हा पदार्थ केवळ घरातील सदस्यांसाठीच नव्हे, तर नातेवाईक, शेजारी आणि मित्रांसाठीही पाठवला जातो. ईदच्या दिवशी सकाळी शिरखुर्मा बनवण्याची परंपरा आहे. मुस्लीम धर्मानुसार रमजान महिन्यात उपवास केल्यानंतर ईदच्या दिवशी गोड पदार्थ खाणे पवित्र मानले जाते. ईदच्या दिवशी फक्त शिरखुर्माच नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या शेवयाही केल्या जातात, जसे की फक्त दूध आणि साखर घालून तयार केलेल्या साध्या गोडसर शेवया, कमी दुधात आणि जास्त सुका मेवा घालून शेवया बनवल्या जातात.

Web Title: Preparations for Ramzan Eid Purchase of ingredients for Shirkhurma and Shewai begins in markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.