प्रवीण गायकवाडांना ‘पवार कनेक्शन’ भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:08 AM2019-04-03T01:08:40+5:302019-04-03T01:09:29+5:30

‘पवारांचा उमेदवार’ हीच ओळख काँग्रेस श्रेष्ठींना खटकली; ‘दिल्ली कनेक्शन’ने जोशींना तारले

Praveen Gaikwad loss due to got 'Pawar Connection' for lok sabha election 2019 in pune | प्रवीण गायकवाडांना ‘पवार कनेक्शन’ भोवलं

प्रवीण गायकवाडांना ‘पवार कनेक्शन’ भोवलं

Next

सुकृत करंदीकर 

पुणे : संभाजी ब्रिगेड आणि शेकापची पार्श्वभूमी असलेले प्रवीण गायकवाड यांनी पुण्यातल्या लोकसभा उमेदवारीसाठी जोर लावला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पाठिंबा गायकवाड यांनी मिळविल्याचे सांगण्यात आले. मात्र, ‘पवारांचा उमेदवार’ हीच ओळख काँग्रेस श्रेष्ठींना खटकल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी मोहन जोशी यांची काँग्रेस निष्ठा आणि दिल्ली दरबारातले जुने संबंध कामी आले आणि काँग्रेसची बहुप्रतीक्षित उमेदवारी त्यांना मिळाली.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी गेल्या महिनाभरापासून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांना भेटण्याचा सपाटा त्यांनी लावला. पुण्यातल्या काँग्रेस भवनात त्यांच्या चकरा वाढल्या. उमेदवारी अर्जही ते घेऊन गेले होते. एवढेच नव्हे तर काँग्रेस पक्षातही त्यांनी रीतसर प्रवेश केला. गायकवाड यांनी त्यांच्या पातळीवर पुण्यात बैठका आणि गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. शरद पवार गायकवाड यांच्या उमेदवारीस अनुकूल असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. या घडामोडींमुळे गायकवाड यांची उमेदवारी निश्चित असल्याचा समज त्यांच्या समर्थकांचा झाला होता. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसच्या दरबारी राजकारणात गायकवाड यांच्या उमेदवारीची चर्चा काही दिवसांपूर्वीच उधळून लावली गेली, असे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी सांगितले, की ‘पुण्याचा उमेदवार कोण?’ या अंतिम स्पर्धेत गायकवाड यांचे नावच नव्हते. माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड व गटनेते अरविंद शिंदे या तिघांची शिफारस काँग्रेस समितीने केली होती. काही दिवसांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी असणारे मल्लिकार्जुन खर्गे यांनी यातले एक नाव लावून धरले होते. प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांनी दुसऱ्या नावाचा आग्रह धरला होता. यामुळे उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत होता. अखेरीस जोशींचा दिल्लीचा जुना संपर्क त्यांच्या कामी आला.

स्वतंत्र बाणा आणि ध्रुवीकरणाचा धोका
प्रवीण गायकवाड यांनी यापूर्वी वेळोवेळी घेतलेल्या जातीय, सामाजिक भूमिका आणि वक्तव्ये यामुळे ध्रुवीकरण होऊन त्याचाही फटका काँग्रेसला अनेक ठिकाणी बसू शकतो, याची जाणीव काँग्रेस निष्ठावंतांनी श्रेष्ठींना स्पष्टपणे करून दिली होती. याच संदर्भाने काही पक्ष-संघटनांनी गायकवाड यांच्या विरोधात भूमिका जाहीर केली. तसेच, काँग्रेस महाआघाडीच्या पुण्यातल्या पहिल्या प्रचार फेरीआधीच गायकवाड यांनी ‘लाल महाला’त स्वतंत्रपणे कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. संभाजी ब्रिगेड आणि शेकापमध्ये असतानाही गायकवाड यांचे वर्तन स्वतंत्र बाण्याचे राहिले आहे. हा एकांडेपणा काँग्रेस संस्कृतीत न बसणारा होता, असे सूत्रांनी सांगितले.



दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निकटवर्ती ही मोहन जोशींची ओळख होती. त्याच माध्यमातून सन १९८६मध्ये जोशी यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले होते. तेव्हापासून जोशी यांनी दिल्लीतल्या फेऱ्या वाढवल्या होत्या. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी जोशी यांचे चांगले संबंध आहेत.

जोशी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्यास हे संबंध कामी आले. ‘आमच्यापैकी कोणीही चालेल; पण बाहेरचा नको,’ हा काँग्रेस निष्ठावंतांनी घेतलेला पवित्रादेखील जोशी यांच्या पथ्यावर पडला. दरम्यान, गुजरातेतील अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवाणी या सामाजिक कार्यकर्त्यांना काँग्रेसने पाठबळ देत राजकारणात आणले. त्याच धर्तीवर पुण्यातून काँग्रेसचा उमेदवार होण्याचा गायकवाड यांचा प्रयत्न होता. मात्र, या दृष्टीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी गायकवाड यांची भेटसुद्धा होऊ शकली नाही. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनीही गायकवाड यांच्यासाठी शब्द खर्च केला नव्हता, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Praveen Gaikwad loss due to got 'Pawar Connection' for lok sabha election 2019 in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.