मतमोजणी पुढे ढकलल्याने १९ दिवस मतपेट्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढली, जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:30 IST2025-12-03T10:29:28+5:302025-12-03T10:30:46+5:30
सुरक्षा एक दिवसाची असो किंवा १९ दिवसांची असली तरी त्यात कोणतीही समस्या निर्माण होत नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

मतमोजणी पुढे ढकलल्याने १९ दिवस मतपेट्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढली, जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
पुणे : नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आता ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने पुढील १९ दिवस जिल्हा प्रशासनाला मतपेट्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. केवळ चाकण व जेजुरी नगर परिषदवगळता जिल्ह्यातील अन्य ठिकाणी मतपेट्या सरकारी गोदाम, इमारत तसेच शाळांमध्ये ठेवण्यात येणार आहेत. मतपेट्यांच्या सुरक्षेबाबत निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच निर्देश दिलेले असतात, त्यामुळे त्यांची सुरक्षा एक दिवसाची असो किंवा १९ दिवसांची असली तरी त्यात कोणतीही समस्या निर्माण होत नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचे ठरले होते. मात्र, ही मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील बारा नगरपरिषदा व तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाच्या पेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी १९ दिवस सबंध यंत्रणा तैनात ठेवावी लागणार आहे. या मतपेट्या चाकण व जेजुरीवगळता अन्य सर्व ठिकाणी शासकीय अथवा तसेच शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी मीरा मंगल कार्यालयात करण्यात येणार आहे, तर जेजुरी नगरपरिषदेच्या मतपेट्यांची व्यवस्था मल्हार नाट्यगृहात करण्यात आली आहे. सुरुवातीच्या निवडणूक प्रक्रियेनुसार तीन डिसेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर मंगल कार्यालय व नाट्यगृह रिकामे करण्यात येणार होते. मात्र, मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने पुढील १९ दिवस या मतपेट्या येथेच ठेवाव्या लागणार आहेत. मात्र, ही व्यवस्था निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून नियोजनात असतेच. त्यात ही मतमोजणी केवळ पुढे ढकलण्यात आली आहे. अन्य व्यवस्था कायम राहणार आहे. त्यात कोणतीही समस्या येणार नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले.
आयोगाने दिलेले निर्देश
आयोगाने याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. मतपेट्या ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणी साठवणूक व व्यवस्थापनाकरिता जबाबदार अधिकाऱ्याची तत्काळ नियुक्ती करावी. सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा अलार्म सिस्टीम, एक्झॉस्ट फॅन, फायर एक्स्टिंग्विशर उपकरणे कार्यान्वित असल्याची खात्री करावी व आवश्यक तेथे बॅरिकेटिंग करावे. गोडाऊनसाठी २४ तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश द्यावा, त्याची नोंद लॉगबुकमध्ये करावी. मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रांवरील ऑन / ऑफ स्वीच लक्षपूर्वक बंद करून ते पेटीत ठेवण्याची खात्री करावी. तसेच राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोडाऊन व सुरक्षा व्यवस्थेची माहिती द्यावी, आदी सूचना दिल्या आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायत - मतमोजणीचे ठिकाण
लोणावळा- मुख्य प्रशासकीय इमारत
दौंड- शासकीय धान्य गोदाम
तळेगाव- नवीन प्रशासकीय इमारत
चाकण- मीरा मंगल कार्यालय
सासवड- नगरपरिषद कार्यालय
जेजुरी- मल्हार नाट्यगृह
इंदापूर- शासकीय धान्य गोदाम
शिरूर- नगरपरिषद नवीन इमारत
जुन्नर- पंचायत समिती
आळंदी- नगरपरिषद इमारत
भोर- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
राजगुरुनगर- तालुका क्रीडा संकुल
वडगाव- नगरपंचायत कार्यालय
माळेगाव- तालुका क्रीडा संकुल
मंचर- तालुका क्रीडा संकुल