बारामती, दौंडमध्ये पोस्ट सेवा बंद, लाडक्या बहिणी चकरा मारून हैराण, रक्षाबंधनच्या तोंडावर राख्या पोचणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:34 IST2025-08-07T16:34:13+5:302025-08-07T16:34:41+5:30
कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार अजून तीन ते चार दिवस या सुविधा पूर्वत व्हायला वेळ लागू शकतो असे सांगण्यात आले आहे

बारामती, दौंडमध्ये पोस्ट सेवा बंद, लाडक्या बहिणी चकरा मारून हैराण, रक्षाबंधनच्या तोंडावर राख्या पोचणार का?
केडगाव (दौंड) : सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये बदल केले जाणार असल्याच्या नावाखाली पोस्टाच्या सुविधा गेल्या तीन दिवसापासून बंद आहे. कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार अजून तीन ते चार दिवस या सुविधा पूर्वत व्हायला वेळ लागू शकतो असे सांगण्यात आले आहे. सध्या पोस्टमध्ये अनेक योजनांचे लाभ थेट खात्यामध्ये होताना दिसत आहे. सर्व्हर बंद असल्यामुळे लाडक्या बहिणी येथे चकरा मारून हैराण झाल्या आहेत. अनेक बहिणींना भावाला राख्या पोस्टाने पाठवायच्या आहेत. त्यामुळे बहिणीची राखी भावाला मिळणार का असा प्रश्न बहिणींना पडला आहे.
अनेक योजनांची कामे या ठिकाणी प्रलंबित दिसत आहेत. टपाल कार्यालयात सुसूत्रता निर्माण करण्यासाठी अत्याधुनिक एपीटी २.० (प्रगत टपाल तंत्रज्ञान) सॉफ्टवेअर कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती टपाल खात्याचे अधीक्षक सु. रा. साबळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. मात्र यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. बारामती विभागाअंतर्गत टपाल विभागाकडून एटीपी २.० सॉफ्टवेअरची अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकांना अधिक वेगवान आणि उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने ही प्रणाली बारामतीत कार्यान्वित केली जाणार आहे. या प्रणालीच्या कार्यान्वयासाठी या काळात कोणतेही आर्थिक किंवा मेल व्यवहार होणार नाहीत.
पोस्टल पुन्हा केव्हा कार्यान्वित होणार असे नागरिक सवाल करीत आहेत. पोस्टमध्ये सध्या पैसे भरता येत नाही किंवा खाते देखील काढता येत नाही कर्मचारी कार्यालयात उपस्थित आहेत मात्र काम शून्य आहे. त्यामुळे गैरसोय होत आहे. महिलांना हेलपाटे मारावे लागत आहेत. नितीन जगताप, केडगाव ता. दौंड ))
सध्या टपाल खात्याच्या प्रणालीमध्ये बदल होत आहे. त्यामुळे नागरिकांची असुविधा होत आहे. सेवा कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांचे गैरसोय होणार नाही - राहुल उगले केडगाव, पोस्टमास्तर