मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 21:09 IST2018-06-30T21:08:42+5:302018-06-30T21:09:12+5:30
पुढील आठवड्यात कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्र व कोकणात काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, शनिवारी राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता अन्यत्र पावसाचा जोर नव्हता. मुंबईत काही ठिकाणी तर कोकणात सर्वत्र पावसाची संततधार सुरू होती.
राज्यात मान्सून सक्रीय असला तरी अनेक भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये ७ मिमी तर सांगली व साताऱ्यात अनुक्रमे १ व २ मिमी पावसाची नोंद झाली. तर कोकण विभागात मुंबईत काही ठिकाणी तर अलीबाग, रत्नागरी या शहरांमध्ये पावसाचा जोर राहिला. विदर्भ व मराठवाड्यातील प्रमुख शहरांमध्ये तुरळक पाऊस पडला. पुढील आठवड्यात सोमवारी कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी तर दि. ३ व ४ जुलै रोजी कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील चार दिवस मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शनिवारी सकाळी आठवाजेपर्यंतच्या चोवीस तासात कोकण व विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात खेड व कर्जतमध्ये ७० मिमी, बेलापुर, खालापुर, पेण, वैभववाडी ६० मिमी, चिपळुण, कल्याण, कणकलवी, मंडणगड, माथेरान,राजापूर, ठाणे, उल्हासनगरमध्ये ५० मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर व सोलापुरमध्ये जोरदार पाऊस झाला. चोवीस तासात दोन्ही ठिकाणी ५० मिमी पावसाची नोंद झाली. तसेच गगनबावडा, माढा, जामखेड, एरंडोल, मुळशी, राधानगरी या भागातही पावसाने हजेरी लावली. अन्यत्र पावसाचा जोर कमी होता. विदर्भात बार्शी, वरूडमध्ये ४० मिमी, तर अकोल्यामध्ये ३० मिमी पाऊस पडला. इतर भागात पावसाने हजेरी लावली असली तरी जोर कमी होता.
---------------