दौंड : दौंड शहराजवळ असलेल्या आलेगाव परिसरातील धुमाळवस्ती येथे पोलिसावर कोयता उगारून पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कांतीलाल रघुनाथ भोकारे, अशोक रघुनाथ भोकारे ( दोघे रा.आलेगाव, धुमाळवस्ती ता.दौंड ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पोलिसांना धुमाळवस्ती येथून ११२ या क्रमांकावर फोन आला होता. त्यानुसार पोलीस धुमाळवस्ती येथे गेले असता आरोपीच्या घरी घरगुती भांडणे सुरू होते. यावेळी आरोपींनी पोलिसांना म्हणाले की, तुम्ही आमच्या घरगुती भांडणात का पडताय? असे म्हणत शिवीगाळ केली. तुमची नोकरी घालवतो असा दमही पोलिसांना दिला. त्यानंतर आरोपी पोलिसांवर धाऊन गेले. यावेळी अशोक भोकरेने एका पोलिसाला गणवेशात असताना खाली पाडून लाथा बुक्याने मारहाण केली तर कांतीलाल भोकरे याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता अन्य एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच मज्जाव केल्यामुळे पुढील अनर्थ टाळला.