माजी उपमहापौराकडून पोलिसाला धमकी

By Admin | Updated: September 10, 2014 00:35 IST2014-09-10T00:35:24+5:302014-09-10T00:35:24+5:30

विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक पोलिसाला मारहाण आणि धमकाविण्याच्या दोन घटना घडल्या, तर काही ठिकाणी मंडळांचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

Police threatens former Deputy Magistrate | माजी उपमहापौराकडून पोलिसाला धमकी

माजी उपमहापौराकडून पोलिसाला धमकी

पिंपरी : विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक पोलिसाला मारहाण आणि धमकाविण्याच्या दोन घटना घडल्या, तर काही ठिकाणी मंडळांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. विरुद्ध दिशेने जाण्यास बंदी असतानाही त्या मार्गावरून वाहन न सोडल्याने कॅम्प भागातील एका माजी उपमहापौराने वाहतूक पोलिसाला धमकाविले. हा प्रकार पिंपरीतील साई चौकात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.
गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे साई चौकातून कराची चौकाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होता. तसेच या रस्त्यावरून एकेरी वाहतूक आहे. तरीही मोटारीतून आलेल्या माजी उपमहापौराने त्या रस्त्याने आपले वाहन सोडण्याचा आग्रह धरला. पोलिसाने वाहन सोडण्यास नकार दिला. त्यानंतर ‘तुझी नोकरी घालवितो, मी कोण आहे माहिती आहे का?’ अशी धमकी माजी उपमहापौराने पोलिसाला दिली. तरीही वाहन सोडत नसल्याने माजी उपमहापौर व त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यावर प्रकरण अंगलट येईल या भीतीने सर्वांनी तेथून पोबारा केला. तरीही वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत स्टेशन डायरीत नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
गणपती विसर्जन मिरवणुकीत वाहतूक नियोजन करीत असताना स्वप्निल शेलार या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. हा प्रकार चिंचवडमधील पवना नदीघाटावर सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. अभय हस्तीमलजी गादिया (वय ४७, रा. सुदर्शननगर, दिवाकर चौक, चिंचवडगाव) याला अटक केली आहे, तर अमित राजेंद्र कांकरिया याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नदीघाटासमोरील रस्त्यावर शेलार वाहतूक नियोजन करीत होते. आरोपींनी त्यांची मोटार रस्त्यातच आडवी लावली होती. दरम्यान, शेलार यांनी मोटार बाजूला घेण्यास सांगितले. मोटार रस्त्यातच उभी करून दोघेही मोटारीतून खाली उतरले. गादियाने शेलार यांचे दोन्ही हात पाठीमागून धरून धक्काबुक्की केली. दोघा आरोपींवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police threatens former Deputy Magistrate