पोलीस भरती प्रकरणात पुण्यात अखेर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:57 IST2018-05-02T16:57:51+5:302018-05-02T16:57:51+5:30
नांदेड पोलिसांनी पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेतील हा गैरप्रकार उघडकीस आणून त्यात १२ जणांना अटक केली होती़.

पोलीस भरती प्रकरणात पुण्यात अखेर गुन्हा दाखल
पुणे : पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेत उत्तर पत्रिका कोऱ्या सोडविण्यास सांगून नंतर बनावट उत्तरपत्रिका तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाच्या ग्रुप २च्या वतीने वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
नांदेड पोलिसांनी पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेतील हा गैरप्रकार उघडकीस आणून त्यात १२ जणांना अटक केली होती़. त्याचा मुख्य सुत्रधार प्रवीण भटकर हा ई़ टी़ एच या कंपनीचा कर्मचारी आहे़. त्यांच्याकडे राज्य राखीव पोलीस दलाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम देण्यात आले होते़. १२ मार्च ते २१ मार्च दरम्यान राज्य राखीव पोलीस दलाच्या रामटेकडी येथील चैत्रबन विश्रामगृहात पेपर तपासणीचे काम सुरु होते़. एसआरपीएफ ग्रुप २ मधील किमान ३० उमेदवारांच्या उत्तर पत्रिकेविषयी संशय व्यक्त करण्यात आला आहे़ . याप्रकरणी एसआरपीएफच्या वतीने पोलीस निरीक्षक नितिकांत पराडकर यांनी फिर्याद दिली आहे़.
याप्रकरणी ई टी़ एच कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे़. या कर्मचाऱ्यांनी लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना मोजकेच प्रश्न सोडविण्यास सांगून, उत्तर पत्रिकेत प्रश्नांचे उत्तराचे ठिकाणी गोळ करुन, बनावट उत्तर पत्रिका तयार केल्या़. पोलीस शिपाई भरतीचे उमेदवारांना गुण वाढवून अवैध मार्गाने निवड होण्याकरीता त्यांना मदत करुन शासनाची फसवणूक केली असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे़. वानवडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.