बारामतीतील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आसाम व पश्चिम बंगालमधील ४ महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:06 IST2026-03-06T18:06:39+5:302026-03-06T18:06:54+5:30
आरोपींनी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवीत असल्याचे पोलिस तपासांत उघड झाले

बारामतीतील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आसाम व पश्चिम बंगालमधील ४ महिलांची सुटका
बारामती: बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर छापा टाकत देह व्यापाराच्या अड्ड्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईत पाचजणांना ताब्यात घेण्यात आले असून, चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी याबाबत बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी सोमनाथ महादेव खोमणे (रा. सावळ, ता. बारामती), धीरज रामभाऊ जाधव (रा. जालना), सागर संजय सोडबुके (रा. बारामती), मेराजुल जानीफ अली (रा. गोलपारा, आसाम), अफजल मझीबर रहमान हुसेन (रा. बरपेटा, आसाम) आणि सदाम जुमरुद्दीन हुसेन (रा. बरपेटा, आसाम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ५ मार्चला सायंकाळी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवीत असल्याचे पोलिस तपासांत उघड झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी आसाम येथील रहिवासी असलेल्या तीन (वय ३०, २१, २६) आणि पश्चिम बंगाल येथील एक (२२) अशा चार महिलांची सुटका केली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३, तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे करीत आहेत. या कारवाईमुळे लॉजिंग व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील, धनश्री भगत, पोलिस अंमलदार नितीन ढवाण, भारत खारतोडे, दादा दराडे, नीलेश वाकळे, सोनाली सूर्यवंशी, स्मिता गायकवाड, चालक आफरीन शेख आणि विठ्ठल तरंगे यांनी केली.