आता बोला...! पोलिसालाच घातला गंडा; स्वस्त आयफोनपायी गमावले १ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 13:27 IST2023-09-12T13:26:41+5:302023-09-12T13:27:46+5:30
पर्वती पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे....

आता बोला...! पोलिसालाच घातला गंडा; स्वस्त आयफोनपायी गमावले १ लाख
पुणे : स्वस्तात एखादी गोष्ट मिळत असेल तर अनेकांची ओढ त्याकडे असते. मात्र, दीड लाखाचा आयफोन एक लाखात मिळवून देण्याच्या आमिषाला चक्क पोलिस हवालदारच बळी पडल्याची घटना घडली. सूरज सुभाष शेडगे (४०, रा. स्वारगेट पोलिस लाइन) असे फसवणूक झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. त्यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
गणेश तुकाराम सुतार (रा. जनता वसाहत) असे आरोपीचे नाव असून, त्याने शेडगे यांना दीड लाखाचा आयफोन १ लाखात मिळवून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी शेडगेंकडून त्याने १ लाख १५ हजार घेतले. मात्र, आयफोन न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल २०२३ पासून सुरू होता. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा सुतार याने फोनही दिला नाही आणि पैसे देखील परत दिले नाहीत. अखेर शेडगेंनी गणेश सुतार विरोधात तक्रार देत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सरवदे करत आहेत.