अनिकेत शिंदे खून प्रकरणातील आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 18:40 IST2018-02-18T18:40:14+5:302018-02-18T18:40:26+5:30
अनिकेत संदीप शिंदे या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी अटक केलेल्या तिघाजणांना २७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

अनिकेत शिंदे खून प्रकरणातील आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडी
चाकण -अनिकेत संदीप शिंदे या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी अटक केलेल्या तिघाजणांना २७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह पाच जण अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात गुरुवारी ( दि. १५ ) रोजी पूर्व वैमनस्यातून अनिकेत शिंदे या सोळा वर्षाच्या शाळकरी मुलावर लोखंडी कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी चाकण येथील आठ तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी किरण फकिरा धनवटे ( वय २३, रा. देशमुख आळी, चाकण ), तेजस दीपक रेपाळे ( वय १९, रा. शिवम रेसिडेन्सी, बी विंग, फ्लॅट नं. ११, चाकण ) व परेश उर्फ प्रवीण ईश्वर गुंडानी ( वय २६, रा. मार्केट यार्ड, शिक्षक कॉलनी, कांडगे वस्ती, चाकण ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या तिघांनाही २७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
यातील मुख्य सूत्रधार ओंकार मच्छिन्द्र झगडे याच्यासह पप्पू धनवटे, नितीन पंचरास, वृषभ देशमुख व महिंद्र ससाणे ( सर्व रा. चाकण, ता.खेड, जि.पुणे ) हे पाचजण अद्याप फरार आहेत. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १६६/२०१८ भादंवि कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६, आर्म अक्ट कलम ३ (१)(२५), ४ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.