चाकण परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; वीस तळीरामांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:59 IST2025-11-02T14:58:14+5:302025-11-02T14:59:07+5:30
मागील अनेक दिवसांपासून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांमुळे नागरिकांत नाराजी निर्माण झाली होती

चाकण परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; वीस तळीरामांना अटक
चाकण : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर आणि अवैध दारू जवळ बाळगणाऱ्यांवर चाकण पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल वीस तळीरामांना अटक केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात सार्वजनिक ठिकाणी गस्त वाढवून ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली.
मागील अनेक दिवसांपासून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांमुळे नागरिकांत नाराजी निर्माण झाली होती. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल पाटील, निरीक्षक सचिन मोरखंडे, पोलीस हवालदार शिवाजी चव्हाण, भैरोबा यादव, मोरमारे, महादेव भिकडं, लोखंडे, अमोल माटे, उषा होले, सरला ताजने या पोलीस पथकाने ही मोहीम राबवली.
या कारवाईत उघड्यावर दारू पिणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने ओरडणे, वाहतुकीत अडथळा निर्माण करणे अशा कारणांवरून वीस जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
सदर सर्व आरोपींविरुद्ध बॉम्बे पोलिस कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास चाकण पोलिस करत आहेत. या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी अशा मोहिमा नियमित राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी कुणीही दारू प्यायला बसू नये किंवा धिंगाणा करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.