गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले,म्हणून सदाशिव पेठेत गस्त घालणाऱ्या पोलिस शिपायाला केली धक्काबुक्की
By नितीश गोवंडे | Updated: March 4, 2025 15:02 IST2025-03-04T15:00:46+5:302025-03-04T15:02:01+5:30
पोलिस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले,म्हणून सदाशिव पेठेत गस्त घालणाऱ्या पोलिस शिपायाला केली धक्काबुक्की
पुणे : गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला हटकल्याने पोलिस शिपायाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना सदाशिव पेठेत घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई कृष्णा सावंत यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई शिंदे आणि सहकारी सोमवारी (दि. ३) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सदाशिव पेठेत गस्त घालत होते. भावे हायस्कूलसमोर टोळके गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर, सावंत आणि सहकारी दुचाकीवरून तेथे पोहोचले. तेव्हा पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला हटकले. गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले. त्यावेळी टोळक्यातील एका तरुणाने पोलिस शिपाई सावंत यांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करणारा तरुण पसार झाला.
सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक गणेश फरताडे पुढील तपास करत आहेत.