पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार

By नितीश गोवंडे | Updated: April 7, 2025 16:32 IST2025-04-07T16:31:34+5:302025-04-07T16:32:34+5:30

सीसीटीव्ही तपासल्याचा अहवाल ससून प्रशासनाला सादर केला जाणार, त्यानंतर जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार

Police check CCTV of Dinanath Hospital Legal action will be taken | पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार

पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार

पुणे : दीनानाथ रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी एका गर्भवती महिलेवर उपचार करण्याचे टाळले. यामुळे तिचा मृत्यू झाला. ३१ मार्च रोजी घडलेल्या या प्रकारानंतर राज्यस्तरावरून दीनानाथ रुग्णालयासह अन्य धर्मदाय रुग्णालयांवर रोष व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना अलंकार पोलिसांनी रुग्णालयात गर्भवती महिला दाखल झाल्यापासून, रुग्णालयातून बाहेर जाईपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्याचा अहवाल ससून प्रशासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भिसे कुटुंबीयांनी दिली तक्रार

दरम्यान महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाविरोधात भिसे कुटुंबियांनी पोलिसांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत रुग्णालयाने केलेल्या अंतर्गत समितीचा अहवाल जगजाहीर करून दीनानाथ मंगेशकरच्या कमिटी मेंबरवर आणि त्या चार सदस्यांवर बदनामी आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज पोलिसांकडे दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केलेला हा रिपोर्ट सर्वदूर पोहोचला असून, आयव्हीएफ बाबतची माहिती ही आमची खाजगी बाब आहे, त्यात पैशांमुळे उपचार न करणाऱ्या डॉ. घैसास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील भिसे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील एक पत्र भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे देखील दिले आहे.

घटनेच्या दिवशीचे सकाळी साडेनऊ चे दुपारी अडीच या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले आहे. या फुटेज संदर्भातील अहवाल आणि भिसे कुटुंबियांनी दिलेली तक्रार याचा अहवाल आम्ही ससून प्रशासनाकडे पाठवणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला थेट याप्रकरणी गुन्हा दाखल करता येत नसल्याने, प्रशासनाचा जो निर्णय येईल, त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. - सुनीता रोकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अलंकार पोलिस ठाणे

Web Title: Police check CCTV of Dinanath Hospital Legal action will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.