पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By नम्रता फडणीस | Updated: March 12, 2025 21:05 IST2025-03-12T21:03:14+5:302025-03-12T21:05:45+5:30

गाडेचा मोबाईल अद्यापही सापडलेला नसून घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

Police are searching for the mobile phone Dattatreya Gade sent to 14 days judicial custody | पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे : स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दिवशी दत्तात्रय गाडे याच्याकडे जो मोबाईल होता, त्याचा शोध घेण्यात येत आहे. हा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही. घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती, असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनीन्यायालयास दिली. दरम्यान, आरोपी गाडे याला न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणात गाडे याला अटक करून १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी (दि. १२) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. पोलिस कोठडी दरम्यान, गाडे याला या गुन्ह्यातील घटनास्थळांवर नेण्यात आले होते. तो ज्या शेतात लपून बसला होता, त्या शेताची पाहणी करून पुरावा गोळा करण्यात आला. या दरम्यान तो ज्यांना-ज्यांना भेटला त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. गाडे याला न्यायालयात आणल्यानंतर न्यायालयाच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने बुधवारी परिसरात चोख बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाडे याची न्यायालयीन कोठडी मागण्यासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर केला. यावेळी बचाव पक्षाच्या वकीलांनी त्याला कपडे पुरविण्याची मागणी केली. आरोपीचे वकील सुमीत पोटे यांनी न्यायालयाकडे न्यायालयातच आरोपीशी बोलण्याची संधी मिळण्याची मागणी केली. गाडे याच्या वतीने ॲड. वाजेद खान-बिडकर यांनी देखील बाजू मांडली, तर मुळ फिर्यादी यांच्यावतीने ॲड. असीम सरोदे यांनी बाजू मांडली.

आतापर्यंत तपासात काय झाले?

- घटनास्थळांचा पंचनामा
- तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला
- प्रत्यक्षदर्शी इतर साक्षीदारांकडे चौकशी
- आरोपी व तरुणीचे कपडे जप्त
- सायंटिफिक विश्लेषणासाठी कपडे पाठवले
- आरोपी व फिर्यादीचे डीएनए सॅम्पल घेतले
- गाडे याच्यावर एकूण सात गुन्हे दाखल

Web Title: Police are searching for the mobile phone Dattatreya Gade sent to 14 days judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.