पीएमआरडीएने वेल्ह्यातील जोडरस्त्यांची कामे करावी : संग्राम थोपटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 18:58 IST2018-10-08T18:49:56+5:302018-10-08T18:58:16+5:30
‘पीएमआरडीए विकासाच्या दृष्टिकोनातून नेमके काय करते याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तळागाळाच्या जनतेपर्यंत विकासकामे पोहचत आहेत.

पीएमआरडीएने वेल्ह्यातील जोडरस्त्यांची कामे करावी : संग्राम थोपटे
पुणे/मार्गासनी : पंतप्रधान आवास योजना उत्कृष्ट आहे. वेल्हे तालुक्यात होणाऱ्या घरकुलांसाठी एक कार्यशाळा राबविण्यात यावी. त्याचप्रमाणे गायरान जागा विकासासाठी शासनाने उपलब्ध करून द्याव्यात. वेल्हे जोड रस्त्यांची कामे पीएमआरडीएच्या माध्यमातून राबविली जावीत, असे मत आमदार थोपटे यांनी व्यक्त केले.
वेल्हेतील कोंढावळे येथे पुणे प्रादेशिक प्राधिकरणने कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी आमदार संग्राम थोपटे, पंचायत समिती सभापती संगीता जेधे, उपसभापती दिनकर सरपाले, पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक, पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, गटविकास अधिकारी मनोज यादव, तहसीलदार प्रदीप उबाळे, माजी पंचायत समिती सभापती सीमा राऊत, सरपंच, उपसरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले, ‘पीएमआरडीए विकासाच्या दृष्टिकोनातून नेमके काय करते याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तळागाळाच्या जनतेपर्यंत विकासकामे पोहचत आहेत. शहरी आणि ग्रामीण भाग जोडण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. पीएमआरडीए हे नियोजन करणारे प्राधिकरण आहे.
मिलिंद पाठक म्हणाले की, वेल्हा तालुक्यात रहिवासी नसलेले नागरिक विनापरवानगी सदनिका बांधण्याचे काम करीत आहेत. अनधिकृत बांधकामांना आळा बसायला हवा. नागरिकांनी बांधकाम परवानगी घेऊन घरे बांधणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकामांची माहिती तहसीलदार, ग्रामसेवक व पोलीस पाटलांनी वेळोवेळी पीएमआरडीएला द्यावी.
नागरिकांच्या सोयीसाठी नसरापूर येथे लवकरच पीएमआरडीएचे कार्यालय होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही आर्थिक दुर्बल घटकांसाठी फायदेशीर व परवडणारी आहे. त्यासाठी अनुदान कशा स्वरूपात उपलब्ध होणार आहे. याविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून वेल्हा ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.