PMC Elections : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून पहिल्या दिवशी आठशे इच्छुकांच्या मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:41 IST2025-12-14T11:39:53+5:302025-12-14T11:41:10+5:30
- तीन ते चार मिनिटांत केलेले काम मांडण्याची कसोटी

PMC Elections : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून पहिल्या दिवशी आठशे इच्छुकांच्या मुलाखती
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे सत्र शनिवारपासून सुरू करण्यात आले. पहिल्या दिवसी तब्बल सातशे ते आठशे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने मिळालेल्या तीन ते चार मिनिटांच्या अवधीमध्ये केलेले कार्य आणि दावेदारी सादर करताना इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागली. इच्छुकांच्या या मुलाखती आज (रविवारी) आणि मंगळवारीही होणार आहेत. पक्षाची कोअर कमिटी चाळण लावून यातील नावे वरिष्ठ नेत्यांकडे पाठवणार आहे. त्यातून उमेदवार यादी तयार केली जाणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.
महापालिकेच्या ४१ प्रभागांसाठी भाजपकडे तब्बल २,५०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक २९ मध्ये सर्वाधिक ९० अर्ज आले आहेत. प्रभाग क्रमांक २८ मध्ये ६०, तर प्रभाग क्रमांक २४ मध्ये ५८ अर्ज मिळाले आहेत. सर्वांत कमी अर्ज प्रभाग क्रमांक ६ आणि १४ मधून प्रत्येकी १५ आले आहेत. बहुतांश प्रभागांमध्ये सर्वसाधारणपणे ३० ते ३२ अर्ज दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेकजण भाजपच्या वाटेवर आहेत. पुढील काही दिवसांमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. मात्र, पक्ष प्रवेश होण्यापूर्वीच काहींनी भाजपचे उमेदवारी अर्ज नेऊन ते भरून पुन्हा जमा केले आहेत.
पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ९८ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपमध्ये शिवसेनेच्या पाच माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. शिवाय इतर पक्षातील वजनदार नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत, या पार्श्वभूमीवर भाजपने या निवडणुकीत १२५ नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले. त्या दृष्टीने भाजपने अर्ज आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे सत्र शनिवारपासून सुरू केले. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पर्वती, कोथरूड व खडकवासला विधानसभा मतदार संघ, माजी सभागृहनेते व निवडणूक प्रभारी गणेश बीडकर यांनी हडपसर, शिवाजी नगर आणि वडगावशेरी तर श्रीनाथ भिमाले यांनी पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांना माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी मदत केली.
दरम्यान, अनेक इच्छुकांनी थेट प्रेझेंटेशनद्वारे आकडेवारी, छायाचित्रे आणि विकासकामे मांडली. काही इच्छुकांनी तर जाडजूड फाइल्स, अहवाल आणि कागदपत्रांचा गठ्ठा घेऊन मुलाखतीला हजेरी लावली होती. मात्र, इच्छुकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने मुलाखतीचा कालावधी अत्यंत मर्यादित ठेवण्यात आला. अवघ्या तीन ते चार मिनिटांत आपली दावेदारी दाखल करावी लागली. काहीजण प्रश्नांच्या सरबत्तीने गोंधळले, तर काहींनी नेमकेपणाने आणि आत्मविश्वासाने उत्तरे देत वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले.
आमच्या मुलाखती सर्वांसमोर नको
भाजपच्या वाटेवर असणाऱ्या इतर पक्षातील काहींनी प्रवेशापूर्वीच भाजपचे उमेदवारी अर्ज भरले आहेत. अद्याप पक्ष प्रवेश नसल्याने सर्वांसमोर मुलाखत कशी द्यायची, असा प्रश्न संबंधितांसमोर निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या मुलाखती सर्वांसमोर नको, अशी भूमिका काहींनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अण्णा जोशी, डॉ. अरविंद लेले, नारायण गोडबोले, डॉ. शंकरराव यादव, प्रदीप रावत, विश्वासराव गांगुर्डे, गिरीष बापट या सर्वांनी पक्षासाठी आपली हयात घालवली. त्यांच्या कष्टाचे फळ आज पक्षाला मिळत आहे. भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इतर पक्षातील अनेकजण इच्छुक आहेत. जेथे जागा असेल तेथे भाजपच्या प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या सक्षम कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल. – गणेश बीडकर, माजी सभागृह नेते व महापालिका निवडणूक प्रभारी