पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत एकाच घरात एकापेक्षा जास्त उमेदवारी देण्याची परंपरा कायम आहे. या निवडणुकीतही पिता-पुत्र आणि पती-पत्नीच्या दोन जोड्या, तर दोघे भाऊ, सासू-सुना, सासरे आणि जावई रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे दोघे भाऊ दोन पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही निवडणूक कौटुंबीकच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत एकाच घरातून एकापेक्षा जास्त जणांना उमेदवारी देण्याची परंपरा भाजप, काँग्रेस, उध्दवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी पाळली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने प्रभाग क्रमांक ३८मधून प्रकाश कदम यांना, तर प्रभाग क्रमांक ३९ मधून प्रतीक प्रकाश कदम आणि प्रभाग क्रमांक ३८मधून उध्दवसेनेचे वसंत मोरे, तर प्रभाग क्रमांक ४०मधून रूपेश वसंत मोरे या दोन पिता-पुत्राची जोडी निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणार आहेत. प्रभाग क्रमांक ३ विमाननगर लोहगावमधून भाजपच्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, तर प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोलीमधून भाजपचे सुरेंद्र पठारे आणि प्रभाग क्रमांक २२ काशेवाडी डायस प्लॉट अ मधून काँग्रेसच्या इंदिरा अविनाश बागवे, तर या प्रभागातील ड मध्ये काँग्रेसचे अविनाश बागवे या दोन पती-पत्नीच्या जोड्या निवडणुकीत उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थनगरमधून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने हर्षवर्धन दीपक मानकर, तर प्रभाग क्रमांक २५मधून महात्मा फुले मंडईमधून भाजपने राघवेंद्र मानकर हे दोघे भाऊ निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक २३ रविवारपेठ, नाना पेठमधून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने अ जागेवरून सोनाली आंदेकर आणि ब जागेवरून लक्ष्मी आंदेकर निवडणूक लढवत आहेत. या दोघांचे नाते सून आणि सासूचे आहे. प्रभाग क्रमांक ३४मधील अ मधून राष्ट्रवादीकडून बापूसाहेब पोकळे, तर ड मधून भाजपकडून राजाभाऊ लायगुडे उभे आहेत. या दोघांचे नाते जावई आणि सासरे असे आहे.
गुन्हेगारी कुटुंबातील चार जण निवडणुकीच्या रिंगणात
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात तीन महिला राष्ट्रवादी (अजित पवार)कडून निवडणूक लढवत आहेत. त्यातील दोघी तुरुंगातून निवडणूक लढविणार आहेत. नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या प्रभाग क्रमांक २३ रविवारपेठ नानापेठमधून निवडणुकीला उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनीमधून कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे या राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक ३९मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)कडून गुंड बापू नायर निवडणूक लढवत आहेत.
घराणेशाही, आजी-माजी आमदार पुत्र निवडणुकीत उभे
पालिका निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक, दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण, माजी राज्यमंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर निवडणुकीत उभे राहिले आहेत. काँग्रेसने माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांचे अविनाश बागवे, शिंदसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे प्रणव धंगेकर, उध्दवसेनेेचे महादेव बाबर यांचा मुलगा प्रसाद बाबर यांच्या मुलासह वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरद पवार)चे बापू पठारे यांचा मुलगा युगेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीत घरणेशाहीचे दर्शन घडत आहे.
Web Summary : Pune's PMC election witnesses family members from same household contesting across parties. Criminal links emerge with candidates facing jail time. Dynastic politics prevalent, sons and daughters of former leaders also in the fray.
Web Summary : पुणे के पीएमसी चुनाव में एक ही घर के सदस्य विभिन्न दलों से चुनाव लड़ रहे हैं। जेल की सजा का सामना कर रहे उम्मीदवारों के साथ आपराधिक संबंध सामने आए। वंशवादी राजनीति प्रबल, पूर्व नेताओं के बेटे और बेटियां भी मैदान में।