Pune: महापालिकेचे कोरोना निर्बंध हटले पण नाट्यगृहे, सभागृहे ५० टक्के क्षमतेनेच राहणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 13:35 IST2021-11-30T13:24:10+5:302021-11-30T13:35:28+5:30
पुणे : कोरोना आपत्तीमुळे एप्रिल २०२०पासून पूर्णत: तथा काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने सवलत मिळालेले, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजक ...

Pune: महापालिकेचे कोरोना निर्बंध हटले पण नाट्यगृहे, सभागृहे ५० टक्के क्षमतेनेच राहणार सुरू
पुणे : कोरोना आपत्तीमुळे एप्रिल २०२०पासून पूर्णत: तथा काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने सवलत मिळालेले, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजक विषयक क्षेत्रांवरील बहुतांश निर्बंध हटविण्यात आले आहेत. मात्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावेच लागणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे़
राज्य शासनाच्या आदेशाचा दाखला देत महापालिकेने नव्याने आपले आदेश काढले आहेत. त्यामध्ये अद्यापही चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह इत्यादी याठिकाणी बंदिस्त अथवा बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांच्या/समारंभाच्या/उपक्रमांच्या जागेच्या क्षमतेच्या पन्नास टक्के लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर खुल्या जागेतील कार्यक्रमांना जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवागनी दिली जाईल. यामुळे शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितीचे बंधन अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. तसेच याठिकाणी पूर्णत: लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे़
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी (दि. २९) याबाबतचे आदेश काढले. या आदेशात कोविड-१९ साथ येण्यापूर्वी विविध स्थानिक व इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळांनुसारच सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक व मनोरंजन क्षेत्रांना खुले राहण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, सोबतच राज्य शासनाच्या आदेशाचा संदर्भ देत कोरोना आपत्तीबाबत लागू केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे पालन करण्याचे बंधनही आयुक्तांनी स्पष्ट केले. हे आदेश पुणे व खडकी कॅन्टोनमेंट बोर्डालाही लागू असतील.