पालखी महामार्गाच्या गटाराच्या कामात चक्क प्लॅस्टीक गजाचा वापर; काटेवाडी येथे प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:28 IST2025-02-14T11:25:02+5:302025-02-14T11:28:13+5:30

काळा रंग देऊन त्यांचा बनावटी लोखंडी गज असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. काटेवाडी येथील नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला

Plastic yards for bridges; Type revealed among citizens at Katewadi | पालखी महामार्गाच्या गटाराच्या कामात चक्क प्लॅस्टीक गजाचा वापर; काटेवाडी येथे प्रकार उघडकीस

पालखी महामार्गाच्या गटाराच्या कामात चक्क प्लॅस्टीक गजाचा वापर; काटेवाडी येथे प्रकार उघडकीस

बारामती - येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या गटार लाईनच्या कामात मोठा गैरप्रकार समोर आला आहे. या गटारासाठी लोखंडी गज (सळई) वापरण्याऐवजी प्लास्टिकचे गज वापरण्यात येत असून, त्यांना वरून काळा रंग देऊन त्यांचा बनावटी लोखंडी गज असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. काटेवाडी येथील नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, त्यांनी या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाचे काम ठप्प असले तरी साईड गटारचे काम सुरू आहे. पूर्वीच्या टप्प्यात लोखंडी गजांचा वापर करण्यात आला होता, मात्र आता प्लास्टिकचे गज वापरण्यात येत आहेत. हे गज जरा जोरात दाबले किंवा दुमडले तर तुकडे होत असून, त्यातून प्लास्टिकचा कचरा बाहेर येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प दर्जाहीन होत असून, भविष्यात मोठा अपघात किंवा नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

याच महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले आहे. पालखी महामार्गाचे काम सध्या ठप्प असून, जे काम झाले आहे तेही निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे आरोपही ग्रामस्थांनी केले आहेत. पालखी महामार्गाच्या कडेच्या गटारावर काम दर्जाचे असल्याचे पूर्ण करण्याची आणि दर्जेदार कामाची मागणीही करण्यात आली आहे.
 



या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी  करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काटेवाडीतील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. गटाराच्या कामात प्लास्टिक गज वापरण्यास परवानगी आहे का, याबाबत देखील शासकीय नियमांबाबत संबंधितांनी खुलासा करण्याची मागणी होत आहे.

हे नवीन तंत्रज्ञान

पालखी महामार्गाचे प्रकल्प संचालक केशव घोडके यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, प्लास्टिक गजाचा वापर मुख्य पुलासाठी तसेच महत्त्वाच्या कामासाठी करण्यात येत नाही. साइड गटर किंवा बाँड्री वॉलसाठी हे प्लास्टिक गज वापरण्यात येतात. त्याचा वापर नियमाने करण्यात येत आहे. हे नवीन तंत्रज्ञान असून यामध्ये काहीही गैर नाही. त्याची चाचणीदेखील सिद्ध झाली आहे.

कामाची तपासणी करा

पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अॅड. तुषार इंझेंडे पाटील म्हणाले की, प्लास्टीकचे गज वापरणे अत्यंत चुकीचे आहे. दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभाग महामार्गाच्या कामाचा दर्जा तपासतो. संबंधित विभागाने पालखी महामार्ग कामाच्या तपासणीची गरज आहे.

नागरिकांमध्ये भीतीयुक्त संभ्रम

१ सध्या प्लास्टिकचा वापर प्रत्येक ठिकाणी वाढला आहे. मात्र, काँक्रीटमध्ये प्लास्टिकच्या सळईचा वापर कितपत योग्य होईल? संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या गटार लाईनच्या कामांमध्ये लोखंडी सळईच्या ऐवजी प्लास्टिकची सळई वापरली जात असल्याने सणसर तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीयुक्त संभ्रम निर्माण झाला आहे.

२ सध्या बहुचर्चित अशा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम देहू ते पंढरपूर सुरू आहे. अनेक ठिकाणची कामे पूर्णही झालेली आहेत. भवानीनगर सणसर येथील रस्त्याचे काम अजूनही अपूर्णच आहे. या रखडलेल्या कामावर रस्त्याच्या कडेच्या गटार लाईनसाठी लोखंडी सळीच्या ऐवजी प्लास्टिकचे रॉड वापरत असल्याने या प्लास्टिक मुळे सदरच्या काँक्रीटचा टिकाऊपणा कितपत राहील याविषयी नागरिक संभ्रमात आहेत. या गटारी वरून लोडची वाहने जाणार येणार असल्याने येथील नागरिकांनी प्लास्टिक सळई वापरास विरोध दर्शवला आहे. याविषयी नॅशनल हायवेच्या संबंधित तज्ज्ञ अभियंत्यांनी, अधिकाऱ्यांनी पुढे येऊन माहिती देणे गरजेचे आहे.

स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा

सध्या नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येत आहे. नॅशनल हायवेच्या प्रकल्पांमध्ये अनेक ठिकाणी नावीन्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव असतो. प्लास्टिकपासून रस्ते तयार करणे, एका दिवसात रस्ता तयार करून रेकॉर्ड करणे त्याचप्रकारे या रस्त्याच्या कामामध्ये वापरलेली सळई ही प्लास्टिकची असेल तर नागरिकांमध्ये जागृती केली पाहिजे व त्याची सत्यता पडताळणी पाहिजे. सदरच्या ठेकेदाराने यापूर्वी बांधलेल्या गटर लाईनवर वापरलेले लोखंडी स्टील आणि आता फायबर किंवा प्लास्टिकचे पोलादी सारखे दिसणारे रॉड वापरत आहेत. यावरून जड वाहने गेल्यावर नुकसानीची शक्यता आहे. टेंडरमध्ये या प्लास्टिकच्या रॉडचा अंतर्भाव असल्यास आम्हाला ते दाखवावे. अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशारा वसंतराव जगताप आणि अभयसिंह निंबाळकर यांनी दिला आहे.

Web Title: Plastic yards for bridges; Type revealed among citizens at Katewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.