पूर्तता होण्यापूर्वीच प्लँट सुरू; महापालिकेचा कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:29 IST2025-02-22T14:29:30+5:302025-02-22T14:29:30+5:30
महापालिकेकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधी प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या

पूर्तता होण्यापूर्वीच प्लँट सुरू; महापालिकेचा कारवाईचा इशारा
- हिरा सरवदे
पुणे : गुईलिन बेरी सिंड्रोमचा (जीबीएस) सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या धायरी, किरकटवाडी, सणसवाडी, नांदेड गावांतील महापालिकेने बंदी घातलेले खासगी आरओ प्रकल्प नियमावलीच्या अधिन राहून ते पुन्हा सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली. मात्र, नियमावलींची पूर्तता करण्यापूर्वीच अनेकांना तातडीने प्रकल्प सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधी प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या आहेत.
गेल्या महिन्यात शहरात विशेषतः सिंहगड रस्ता भागातील धायरी, किरकटवाडी, सणसवाडी, नांदेड आदी गावांमध्ये माेठ्या प्रमाणावर जीबीएस या आजाराचे रुग्ण आढळून आले हाेते. हा आजार दूषित पाण्यामुळे हाेत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केल्यानंतर महापालिकेने या परिसरातील विविध ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये पाण्यात दोष आढळलेल्या खासगी आरओ प्रकल्प सील केले होते.
त्यानंतर आरओ प्रकल्पाची महापालिकेकडे नोंदणी करावी, नियमित देखभाल दुरुस्ती करून घ्यावी, राज्य सार्वजनिक आरोग्य शाळेकडून पाण्याची तपासणी करून घ्यावी, असे नियम लागू करून बंद आर.ओ. प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास दोन दिवसापूर्वी परवानगी दिली आहे. तसेच आरओ प्रकल्प असलेल्या हद्दीतील क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षकांनी वेळोवेळी पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी, पाणी दूषित असल्यास संबंधित प्रकल्प बंद करावा, असेही आदेश दिले आहेत.
दरम्यान, महापालिकेने परवानगी देत असल्याचे जाहीर केल्याबरोबर प्रकल्प चालकांनी कसलीही तपासणी न करता थेट सील केलेले प्रकल्प सुरू केल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियमांची पूर्तता न करता सुरू केलेल्या आरओ प्रकल्पांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.