पुलंच्या पत्रांचा ठेवा पुस्तकरूपात, गेल्या ५० वर्षांतील विविध मान्यवरांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 02:07 AM2018-11-08T02:07:35+5:302018-11-08T02:07:51+5:30

महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले पु. ल. देशपांडे यांची ‘सिद्धहस्त’ लेखणी केवळ साहित्य, नाटक किंवा चित्रपट क्षेत्रापुरतीच मर्यादित नव्हती, तर ‘पत्र’प्रपंच हादेखील त्यांच्या लेखनाचा एक अविभाज्य भाग होता.

P.L. Deshpande's letters | पुलंच्या पत्रांचा ठेवा पुस्तकरूपात, गेल्या ५० वर्षांतील विविध मान्यवरांशी संवाद

पुलंच्या पत्रांचा ठेवा पुस्तकरूपात, गेल्या ५० वर्षांतील विविध मान्यवरांशी संवाद

- नम्रता फडणीस
पुणे - महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले पु. ल. देशपांडे यांची ‘सिद्धहस्त’ लेखणी केवळ साहित्य, नाटक किंवा चित्रपट क्षेत्रापुरतीच मर्यादित नव्हती, तर ‘पत्र’प्रपंच हादेखील त्यांच्या लेखनाचा एक अविभाज्य भाग होता. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची पुलंच्या साहित्यावर उत्तम भाष्य करणारी... त्यावर चर्चा करणारी अथवा काही वैयक्तिक विषयांवरची पत्रे... त्यावर पुलंनी पत्रांमधूनच त्यांच्याशी साधलेला संवाद.. असा पुलंच्या खजिन्यामध्ये संग्रही असलेला पत्रांचा ठेवा पुस्तकरूपात जतन केला जात आहे. हे पुस्तक दोन खंडांमध्ये निर्मित केले जात असून, एकाच पुस्तकाला प्रथमच तीन मान्यवरांची प्रस्तावना आहे.

गेल्या ५० वर्षांमधला पुलंच्या पत्रांचा हा दुर्मिळ आणि अमूल्य दस्तऐवज आहे. यामध्ये गायक कुमार गंधर्व, जे. आर. डी टाटा, भीमसेन जोशी, सुधीर फडके, लता मंगेशकर यांच्यासह साहित्य क्षेत्रातील ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर अशा दिग्गजांनी पुलंना पाठविलेली आणि पुलंनी त्याला प्रतिसाद दिलेल्या पत्रांचा समावेश आहे. पुलंचा बंगाली रंगभूमी आणि साहित्याशी उत्तम संपर्क होता. त्यासंबंधीची पत्रेही यात आढळतात. माध्यम प्रकाशनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून या पुस्तकावर काम सुरू असल्याची माहिती प्रकाशक उन्मेष अमृते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ते म्हणाले, ‘‘ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या ‘सुनीताबाई’ या पुस्तकात या पत्रांचा उल्लेख होता. ही पत्रे सुनीताबाई यांचे भाचे दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांच्याकडून आम्हाला मिळाली. गिरीश ढोके, अमित जठार आणि मी असे आम्ही तिघेही या पुस्तकाचे प्रकाशक आहोत. जवळपास ४५० पत्रांचे हे पुस्तक दोन खंडांत प्रकाशित केले जाणार आहे. पहिल्या खंडात साहित्याशी संबंधित पत्रे आणि दुसऱ्या खंडातील पहिल्या भागात संगीत व नाटक, तर दुसºया भागात सामाजिक पत्रे पाहायला मिळणार आहेत. साहित्याला विजय कुवळेकर, संगीत व नाटक याला पं. सत्यशील देशपांडे आणि सामाजिक भागाला डॉ. विकास आमटे यांची प्रस्तावना आहे. अजूनही काही पत्रे आम्हाला मिळण्याची शक्यता आहे.’’

शो मस्ट गो आॅन.....
दि. ७ नोव्हेंबर पुलंच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांचा स्मृतिदिन, तर ८ नोव्हेंबर पुलंची जयंती. ज्या वेळी २००९ मध्ये सुनीताईबार्इंचे निधन झाले, त्याच्या दुसºया दिवसापासून ‘पुलोत्सव’ पुण्यात दहा दिवस रंगणार होता. आयोजकांपुढे आता काय करायचे? असा पेच निर्माण झाला. दहा दिवसांचा महोत्सव रद्द करता येणे शक्य नव्हते. सुनीताबाईंचे भाऊ सदानंद ठाकूर यांनी दोघांनाही महोत्सव रद्द करणे आवडले नसते; त्यामुळे महोत्सव साधेपणाने करण्याची कल्पना मांडली. अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते ‘पुलोत्सवा’चे उद्घाटन होणार होते. नानाच्या मते दोघेही परफेक्शनिस्ट असल्यामुळे साधेपणाने झालेला महोत्सवही त्यांना आवडणार नाही... अशा काहीशा मतमतांतरानंतर ‘शो मस्ट गो आॅन’ याप्रमाणे सुनीताबार्इंच्या निधनानंतरही ’पुलोत्सव’ पार पडला.

पु.ल. जन्मशताब्दीस आजपासून सुरुवात
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने उद्यापासून पु.ल. जन्मशताब्दी महोत्सव २०१८ ला प्रारंभ होत आहे. यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असलेले ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर आणि लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या विचारावर, कार्यावर व जीवनावर आधारित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवात होणाºया विविध कार्यक्रमांबरोबरच फोटो, दृक्श्राव्य चित्रफिती, रांगोळी व पुस्तकांचे प्रदर्शनही या काळात रसिकांसाठी उपलब्ध होणार आहे. उद्या (दि. ८ नोव्हेंबर) सायंकाळी ‘वक्ता दशसहस्रेषु’ हा पु. ल. देशपांडे यांच्या दुर्मिळ भाषणांचा दृक्श्राव्य कार्यक्रम आशय फिल्म कल्ब आणि पु. ल. कुटुंबीयांच्या वतीने सादर होणार आहे.

Web Title: P.L. Deshpande's letters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.