शासनाची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी आमदार सुनील शेळकेंवर कारवाई होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:40 IST2025-07-05T19:39:25+5:302025-07-05T19:40:48+5:30

या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी व्हावी,अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. आता शेळकेंवर कारवाई होणार का,असा सवाल तालुक्यातून विचारला जात आहे.

pimpri chinchwad Will action be taken against MLA Sunil Shelke for embezzling crores of government royalties | शासनाची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी आमदार सुनील शेळकेंवर कारवाई होणार का ?

शासनाची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी आमदार सुनील शेळकेंवर कारवाई होणार का ?

पिंपरी : मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर दगड आणि खाणींच्या उत्खननातून शासनाची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी व्हावी,अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. आता शेळकेंवर कारवाई होणार का,असा सवाल तालुक्यातून विचारला जात आहे.

मावळ तालुक्यात दगड आणि खाणींचे उत्खनन करण्याचे प्रकार सध्या जोरात सुरू आहेत. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शासनाची परवानगी न घेता शेळके यांनी दगड आणि खाणींचे उत्खनन केले. मात्र, त्याची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही.आंबळे गावातील खाण जमिनींवर शेळके यांनी उत्खनन केले असून, त्या जमिनीत सुमारे १०० फूट खोल खड्डे पडले आहेत. उद्योगासाठी अयोग्य असतानाही एमआयडीसीने ही खाण जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केली. त्या बदल्यात शेळकेंना २९ हेक्टर जमीन पर्यायी क्षेत्र म्हणून देण्यात आली. मात्र, ते इतर शेतकऱ्यांना मिळाले नाही. प्रतिएकर ७३ लाखांची खाण जमीन घेऊन २.५ कोटी प्रतिएकर किमतीची जमीन देण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने दिला. या संपूर्ण प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी न झाल्यास हे प्रकरण दडपले जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. 

जानेवारीत वाहनांवर कारवाईवेळी अडसर;रंगले होते नाट्य

दि. २२ जानेवारीस किवळे ते देहूरोडदरम्यान गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या १८ वाहनांवर पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयाने कारवाई केली होती. त्यापैकी ११ वाहने जप्त करण्यात आली, तर बाकीची सोडून देण्यात आली.याबाबत गुन्हा नोंदवण्यासाठी महसूलचे अधिकारी देहूरोड पोलिस ठाण्यात गेले. मात्र, राजकीय दबाब आल्याने पोलिसांनी एफआरआय दाखल करून घेतला नाही. जप्त केलेली वाहनेही ठेवून घेण्यास नकार दिला होता.

बड्या नेत्याने धारेवर धरल्याने लपवाछपवी

कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी या वाहनांचे मालक असलेले कार्यकर्ते तहसील कार्यालयात तळ ठोकून होते. प्रशासनाने त्यांना न जुमानल्याने बडा नेता तेथे दाखल झाला. त्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाई केलेल्या वाहनांचे क्रमांक आणि दंडाच्या रकमेची माहिती दिली नाही. वाहने जप्त केलेल्या जागेबाबतही चुकीची माहिती दिली होती. या प्रकरणात आमदार सुनील शेळके यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. 

पुरावे दिल्यावरच खुलासा
कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना खासदार राऊत यांनी आरोप केले आहेत. मला कोणती नोटीस आली असेल अथवा चौकशी सुरू असेल तर त्यांनी त्याचे लेखी पुरावे द्यावेत. तोपर्यंत मी याबाबत कोणताही खुलासा देणार नाही. - सुनील शेळके,आमदार,मावळ

Web Title: pimpri chinchwad Will action be taken against MLA Sunil Shelke for embezzling crores of government royalties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.