‘सदानंदाचा येळकोट...’च्या गजरात धामणी येथे म्हाळसाकांत खंडोबाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:14 IST2026-02-01T18:14:23+5:302026-02-01T18:14:58+5:30
- पारंपरिक पूजेनंतर देवाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

‘सदानंदाचा येळकोट...’च्या गजरात धामणी येथे म्हाळसाकांत खंडोबाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले
मंचर : ‘सदानंदाचा येळकोट...’च्या गजरात धामणी येथे म्हाळसाकांत खंडोबाची यात्रा सुरू झाली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पुणे, नगर, नाशिक, मुंबई येथील भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील श्रीक्षेत्र श्री म्हाळसाकांत खंडेरायाचे हजारो भाविकांनी रविवारी दर्शन घेतले. ‘सदानंदाचा येळकोट’चा जयघोष आणि भंडारा-खोबऱ्याची उधळण करण्यात आली.
रविवारी पहाटे मुख्य मंदिरातील स्वयंभू सप्तशिवलिंगाचा रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक केल्यानंतर स्वयंभू सप्तशिवलिंगावर पंचधातूच्या सर्वांगसुंदर लोभस खंडोबा, म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यांची प्रतिष्ठापना करून देवाच्या मुखवट्यांना वस्त्रालंकार घालण्यात आले. खंडोबाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून पारंपरिक पूजा केली. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. पारंपरिक पूजेनंतर देवाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
यावेळी हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर व परिसर झळाळून गेला होता. मंदिराच्या गाभाऱ्यात व मंदिराभोवती आकर्षक फुलांची सजावट केली होती. भाविकांकडून तळी भंडाऱ्याची उधळण करून नवसपूर्तीचे जागरण गोंधळ घालण्यात येत होते. भाविकांनी यात्रेच्या घाटातून नवसाचे बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला. यात्रेत जिलेबी, भजी, शेव चिवडा, शेव रेवडीचा स्वाद घेतला. शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी केली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नवी मुंबई या महानगरांतील भाविकांनी सकाळपासूनच देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह जाणवत होता.
मंदिर परिसरात अनेक व्यापाऱ्यांनी भंडारा, खोबरे व फुलांची, पेढे विक्रीची दुकाने लावली होती. सकाळी ग्रामस्थ व भाविकांनी मिरवणुकीने देवाला हार-तुरे, मांडवडहाळे व नैवेद्य अर्पण केले. धामणीच्या पेठेतून बगाडाची मिरवणूक काढण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रेची मंदिर व परिसरातील व्यवस्था देवस्थान व सेवेकरी मंडळी, धामणी, लोणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वर वस्ती येथील ग्रामस्थांनी पाहिली. आरोग्य विभागाने आरोग्याच्या सुविधा पुरवल्या. देवस्थानकडून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सेवा उपलब्ध केली होती.