'पीएमआरडीए' हद्दीतील नद्यांचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरतोय

By नारायण बडगुजर | Updated: February 25, 2026 15:17 IST2026-02-25T15:17:04+5:302026-02-25T15:17:30+5:30

- महापालिका बाराही महिने राबविते स्वच्छता मोहीम; मात्र पुणे महानगर हद्दीत उपाययोजनांची आवश्यकता; संयुक्त नदी सुधार योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगून वेळकाढूपणा

Pimpri Chinchwad the rivers within the PMRDA limits are being choked by waterlogging. | 'पीएमआरडीए' हद्दीतील नद्यांचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरतोय

'पीएमआरडीए' हद्दीतील नद्यांचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरतोय

पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील नद्यांमधून जलपर्णी थेट महापालिका हद्दीत येते. त्यामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागतो; तसेच महापालिकेलाही बाराही महिने सातत्याने जलपर्णी काढावी लागत आहे. 'पीएमआरडीए' प्रशासनाने जलपर्णी काढण्यासाठी उपाययोजना न केल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. संयुक्त नदी सुधार योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगून पीएमआरडीए प्रशासन वेळकाढूपणा करत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पीएमआरडीए हद्दीतील मावळ तालुक्यात उगम असलेल्या पवना आणि इंद्रायणी नदी पिंपरी-चिंचवड शहरातून जातात. या नद्यांमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी महापालिकेतर्फे जलपर्णी नियमितपणे काढली जाते. मात्र, त्यानंतरही जलपर्णी कमी होत नाही. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत या दोन्ही नदीपात्रांत मोठ्या प्रमाणात जलपर्णी तयार होते.

ती वाहत महापालिका हद्दीत येते. त्यामुळे डासोत्पत्ती होऊन शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पिंपरी-चिंचवड महापालिका; तसेच पीएमआरडीए हद्दीतील मैला व सांडपाणी, घनकचरा, औद्योगिक कंपन्यांचे रसायनमिश्रित पाणी थेट पवना आणि इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. त्यासाठी नदी सुधार योजना प्रस्तावित आहे. पीएमआरडीएतर्फे त्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जलपर्णी काढण्यासाठी पीएमआरडीएने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

आठ दिवसांत 'जैसे थे'

महापालिकेकडून ठेका देण्यात आला असून, नदीतील जलपर्णी नियमित काढण्यात येते. सध्या महापालिका हद्दीतील नदीपात्रातून जलपर्णी काढण्यात आली आहे. मात्र, पीएमआरडीए हद्दीतील जलपर्णी वाहत येते. त्यामुळे महापालिका हद्दीतील नदीपात्रात आठ दिवसांत पुन्हा जलपर्णी दिसून येते. 


संयुक्त उपक्रम राबविणार

इंद्रायणी नदीची एकूण लांबी १ १०५.३० किलोमीटर असून, त्यातील ८७.५ किलोमीटरचा प्रवाह पीएमआरडीएच्या हद्दीत येतो. पवना नदी ६० किलोमीटर प्रवास करते. त्यातील ३५ किलोमीटरचा प्रवाह पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येतो.
 
पवना नदी सुधार योजनेसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, दोन्ही नद्यांसाठी संयुक्त उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जलपर्णी काढण्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे.

नदीं सुधार प्रकल्प पूर्ण होईपर्यंत जलपर्णी काढण्याबाबत पीएमआरडीए प्रशासनाने उपायायेजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासानाने तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Web Title : पीएमआरडीए नदियों में जलकुंभी से घुटा दम; कार्रवाई की मांग।

Web Summary : पीएमआरडीए की नदियों में जलकुंभी की गंभीर समस्या, पिंपरी-चिंचवड प्रभावित। नगरपालिका लगातार हटाने के लिए संघर्ष कर रही है। नागरिक पीएमआरडीए से कार्रवाई की मांग करते हैं, उपेक्षा और संयुक्त नदी सुधार योजनाओं में देरी को मुख्य समस्या बताते हैं।

Web Title : Water hyacinth chokes PMRDA rivers; action urged to clear it.

Web Summary : PMRDA rivers face severe water hyacinth issues, impacting Pimpri-Chinchwad. The municipality struggles with continuous removal. Citizens demand PMRDA action, citing neglect and delayed joint river improvement plans as the core problem.