Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची ४४३ कोटींची निविदा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:37 IST2025-11-28T13:37:06+5:302025-11-28T13:37:38+5:30
- पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून योजनेस गती : प्रदूषण आणि पूर नियंत्रण, मैलाशुद्धीकरण केंद्रासह नदीकाठ सुशोभीकरण होणार

Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची ४४३ कोटींची निविदा प्रसिद्ध
पिंपरी : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गती मिळाली आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर इंद्रायणी नदी सुधारअंतर्गत विविध कामांसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ४४३ कोटी ५१ लाख १० हजार १५२ रुपयांची निविदा काढली आहे. यामध्ये प्रदूषण नियंत्रण, पूर नियंत्रण, मैलाशुद्धीकरण केंद्रासह इंद्रायणी नदीकाठ सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात तळवडेपासून चऱ्होलीपर्यंत सुमारे २०.६ किलोमीटर इंद्रायणी नदीची लांबी आहे. नदीच्या उत्तरेस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) हद्द आहे. यामध्ये येलवाडी, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धोनोरे आदी गावांचा समावेश आहे.
नदीकाठी देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्रे आहेत. आषाढी, कार्तिकी एकादशी, संत तुकाराम महाराज बीज या सोहळ्यांसह वर्षभर वारकरी या दोन्ही तीर्थक्षेत्रांवर येतात. इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. मात्र, नदी प्रदूषित झाल्याने स्थान करण्यास मनाई करण्यात आली आहे. अनेक शहरे, गावे आणि औद्योगिक परिसरातील सांडपाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे प्रदूषण आणि पूर नियंत्रण करण्याचा निर्णय झाला आहे.
येत्या १८ डिसेंबरपर्यंत निविदा भरता येणार
वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीसाठी नदी सुधार प्रकल्पाची घोषणा झाली. अनेक वर्षांपासून त्याची चर्चा सुरू आहे. महापालिकेने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी प्रकल्प आराखडा तयार केला. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने या प्रकल्प आराखड्याला मान्यता दिली होती. त्यानंतर महापालिकेने या प्रकल्पासाठी ४४३ कोटी ५१ लाख १० हजार १५२ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. कंत्राटदारांना १८ डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी सर्व प्रशासकीय, तांत्रिक मान्यता आणि निधीची उपलब्धता करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना दोन ठिकाणी ६० एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रण, पूर नियंत्रण आणि नदीकाठ सुशोभीकरणाच्या कामांचा या निविदेत समावेश आहे. - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका