चिंचवड येथे वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे त्रिकुट गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 16:34 IST2025-09-21T16:34:08+5:302025-09-21T16:34:44+5:30
- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या; संशयितांकडून १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा १४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

चिंचवड येथे वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे त्रिकुट गजाआड
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ ने एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावला. दोन वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन संशयितांना अटक केली. संशयितांकडून १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा १४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
आबासाहेब अंकुश मदने (३५, रा. विकासनगर, देहूरोड), कैलास पांडुरंग टोन्पे (३२, रा. गायकवाड नगर, दिघी), वैभव जनार्दन सूर्यतळ (३०, रा. लक्ष्मीनगर, रावेत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी तीन अज्ञातांनी मुंबईला जाणाऱ्या दोन वृद्ध महिलांना मदतीच्या बहाण्याने त्यांच्या कारमध्ये बसवले. वाकड पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत त्यांना फिरवून, संशयितांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील १२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत आठ लाख ४७ हजार रुपये होती. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. गुन्ह्यात वापरलेल्या कारची माहिती मिळवून, १८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी वाल्हेकरवाडी, चिंचवड परिसरातून तीन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. चोरी केलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पाच लाख ७० हजारांची कार पोलिसांनी संशयितांकडून जप्त केली. संशयित आबासाहेब मदने याच्याविरुद्ध यापूर्वीही बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
अन् गुन्हा उघड झाला
या गुन्ह्याचा समांतर तपास करताना युनिट चारच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून कारची माहिती मिळवली. त्यावरून कारमालक आणि संशयितांपर्यंत पोहचणे शक्य होऊन गुन्ह्याची उकल करण्यात यश आले. युनिट चारचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार व पथकाचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कौतुक केले.
यांनी केली कामगिरी
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार, उपनिरीक्षक भरत गोसावी, मयुरेश साळुंखे, प्रवीण दळे, नितीन ढोरजे, अंमलदार कृणाल शिंदे, सुरेश जायभाये, तुषार शेटे, मो. गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवि पवार, धनंजय जाधव यांनी ही कामगिरी केली.