गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्वेलर्समध्ये सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:52 IST2026-03-20T11:52:29+5:302026-03-20T11:52:53+5:30
- दर खाली आल्याने दुकाने गजबजली : लग्नसराईसाठीही मागणी; हिऱ्यांच्या दागिन्यांना विशेष पसंती; घडणावळीवर सूट आणि ‘ईएमआय’च्या सुविधेमुळे गुंतवणूकदार आकर्षित

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्वेलर्समध्ये सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
पिंपरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अचानक सोने-चांदीचे दर खाली आल्याने शहरातील ज्वेलर्स दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दुकाने गजबजली होती. लग्नसराईसाठीही खरेदीला चांगली मागणी राहिली. सोने-चांदीसह हिऱ्यांच्या दागिन्यांना विशेष पसंती मिळाली.
ग्राहकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून मुख्यतः हार, कंठी, मंगळसूत्र, बांगड्या, पैंजण, अंगठ्या, कर्णफुले, ब्रेसलेट, पेंडंट, नथ, बाजूबंद आणि चांदीची नाणी, सिक्के, पूजेच्या वस्तू खरेदी केल्या. अनेक ज्वेलर्सनी घडणावळीवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली. काही ठिकाणी ईएमआयची सुविधाही उपलब्ध करून दिली. यामुळे ग्राहकांचा उत्साह वाढला.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर घसरल्याने ग्राहकांचा प्रतिसाद जबरदस्त मिळाला. लग्नसराईसाठी हार, मंगळसूत्र, अंगठी, चेन आणि हिऱ्यांच्या सेट्सना खूप मागणी आहे. दिवसभर दुकानात गर्दी कायम राहिली. - रवी कावेडीया, संचालक, कावेडीया ज्वेलर्स
पाडव्याच्या शुभ दिवशी सोने-चांदी खरेदीची परंपरा कायम आहे. दर कमी झाल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात दागिने घेतले. आम्ही घडणावळीवर सूट दिली असून, ईएमआयच्या पर्यायाने तरुण ग्राहकही खरेदी करत आहेत. - शिरिष कटारिया, संचालक, सुनिती ज्वेलर्स
सकाळपासून रात्रीपर्यंत दुकानात गर्दी होती. सोने-चांदीबरोबर हिऱ्यांच्या दागिन्यांना चांगली मागणी आहे. लग्नासाठी मंगळसूत्र, ब्रेसलेट, नेकलेस आणि रिंग्जची खरेदी वाढली. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला. - राहुल सोनिगरा, संचालक, एसजेपीएस सोनिगरा ज्वेलर्स
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. सोने-चांदीचे दर वर-खाली होत असताना अनेक ग्राहक लाईव्ह सोने-चांदीच्या किमती पाहून खरेदी करत होते. ग्राहकांनी संस्कृती जपत सोने खरेदीचा आनंद लुटला. - प्रकाश मेहता, संचालक, भरत ज्वेलर्स