ठेकेदारांच्या हलगर्जीपणाने महापालिकेची फजिती; विसर्जन व्यवस्थेचा ‘गोंधळात गोंधळ’
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 2, 2025 14:13 IST2025-09-02T14:12:14+5:302025-09-02T14:13:23+5:30
- गेल्यावर्षी दीड कोटीचा खर्च : यंदा चार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता; विसर्जन कुंडांत जमा होणाऱ्या गणेशमूर्ती वेळेवर न नेल्याने मूर्तींचे ढिगारे; कर्मचारी उपलब्ध नसल्याने वाहने तशीच उभी

ठेकेदारांच्या हलगर्जीपणाने महापालिकेची फजिती; विसर्जन व्यवस्थेचा ‘गोंधळात गोंधळ’
पिंपरी : शहरातील गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून मोठा गाजावाजा करून कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात या व्यवस्थेची सूत्रे सांभाळणाऱ्या खासगी ठेकेदारांचा निष्काळजी कारभार समोर आला आहे. विसर्जन कुंडांत जमा होणाऱ्या गणेशमूर्ती वेळेवर न नेल्याने मूर्तींचे ढिगारे तयार होत आहे. काही ठिकाणी ठेकेदारांचे कर्मचारी उपलब्ध नसल्याने वाहने तशीच उभी आहेत.
भाविकांनी दान केलेल्या मूर्ती वाहून नेण्यासाठी महापालिकेच्या लाखो रुपयांचा खर्च करून ठेकेदारांची नेमणूक केली जाते. गेल्या वर्षी या कामांसाठी महापालिकेने ठेकेदारांना दीड कोटी रुपये दिले होते. यंदा मात्र, कार्यशाळा विभाग आणि प्रभाग स्तरावर वेगवेगळी कामे देण्यात आल्याने खर्च साडेचार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने स्पष्ट सूचना देऊनही ठेकेदारांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
प्रत्येक वाहनावर किमान चार मजुरांची उपस्थिती बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी मजुरांची अनुपस्थिती आढळून येत आहे. त्यामुळे विसर्जित मूर्ती उचलणे, वाहतूक करणे आणि त्यांचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यास विलंब होत आहे.
पुन्हा दुहेरी उकळपट्टीचा प्रकार?
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ठेकेदारांचा संशयास्पद कारभार दिसत आहे. कार्यशाळा विभागाच्या माध्यमातून अतिक्रमण व उद्यान विभागासाठी दिलेल्या गाड्याही मूर्ती वाहून नेण्यासाठी वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. एकाच कामाचे दोन्ही विभागांकडून पैसे उकळण्याचा प्रकार पुन्हा सुरू असल्याचा आरोप होत आहे. दीड तसेच पाच दिवसांच्या विसर्जनावेळी, तर काही गाड्यांवर मजूरच नव्हते. सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांनी स्वतः पुढाकार घेऊन मूर्ती भरून दिल्याची कबुली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खासगीत दिली आहे.
महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
विसर्जन स्थळावर वेळेत वाहने न पोहोचणे, मजुरांची टंचाई आणि जबाबदारीकडे केलेला दुर्लक्ष या सर्वामुळे संपूर्ण विसर्जन व्यवस्थाच विस्कळीत होत आहे. यामुळे महापालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिक आणि कर्मचारी या दोन्ही स्तरांवरून ठेकेदारांच्या या बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या कार्यशाळेच्या वतीने वाहने उपलब्ध करुन दिली आहेत. पहिल्या काही दिवसांमध्ये वाहनांची उपलब्धता कमी होती. मात्र, आता ठेकेदारांकडून वाहनांची संख्या वाढविण्यात आली आहे. - कैलास दिवेकर, कार्यकारी अभियंता, महापालिका