हिंजवडीसह सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:30 IST2025-07-08T16:30:00+5:302025-07-08T16:30:43+5:30

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन : एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

pimpri chinchwad Instructions to include seven villages including Hinjewadi in the Municipal Corporation | हिंजवडीसह सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी सूचना

हिंजवडीसह सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी सूचना

पिंपरी : मुळशी व मावळ तालुक्यांतील सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी शिंदे यांना सूचना केली आहे. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सात गावांचा समावेश करावा, यासाठी बैठक झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, वसंत साखरे, प्रकाश बुचडे, बाबासाहेब साखरे, आनंद बुचडे, तानाजी हुलावळे, बाबासाहेब बुचडे, दिलीप हुलावळे, लहू गायकवाड, संजय जाधव, रोहन जगताप, विक्रम साखरे, सचिन लोंढे, सचिन शिधे आदी उपस्थित होते.

कोणती आहेत ही गावे?

हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे व गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यासाठी २०१८ मध्येच महापालिकेने ठराव करून शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.

का करावीत गावे समाविष्ट ?

राजीव गांधी आयटी पार्कमुळे या परिसरात आयटी व औद्योगिक प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर आयटीयन्स व बाहेरील नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. या सात गावांची एकत्रित तरंगती लोकसंख्या अंदाजे २ लाखांवर पोहोचली आहे. यामुळे रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, वाहतूक यंत्रणा यावर ताण वाढला आहे. विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने विकासकामे रखडली आहेत.

काय होणार फायदे

एकसंध नागरी प्रशासनाखाली नियोजनबद्ध व शाश्वत विकास, समन्वित व जलद निर्णयक्षम व्यवस्था, वाहतूक समस्यांवर ठोस उपाय, आवश्यक नागरी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध, उद्योग व आयटी क्षेत्राला सहकार्य आणि शासनाच्या महसुलात वाढ होणार आहे. या विषयासंदर्भातील निर्णय त्वरित व्हावा, अशी मागणी केली.

Web Title: pimpri chinchwad Instructions to include seven villages including Hinjewadi in the Municipal Corporation