मी सीबीआय अधिकारी बोलतोय…! पिंपरीत ३५ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:10 IST2026-02-15T15:10:10+5:302026-02-15T15:10:48+5:30
- तब्बल ३५ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मी सीबीआय अधिकारी बोलतोय…! पिंपरीत ३५ लाखांची फसवणूक
पिंपरी - स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात मोबाइलधारकांनी पिंपरीतील व्यक्तीकडून तब्बल ३५ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २२ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान मोरवाडी परिसरात घडली.
या प्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व्यक्तीने शुक्रवारी (दि. १३) तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कशी झाली फसवणूक?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत फोन केला. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार असल्याची भीती दाखवून खात्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. नंतर “प्रकरण मिटवण्यासाठी” विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. घाबरलेल्या व्यक्तीने एकूण ३५ लाख रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले.
पोलिसांचा इशारा
पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही सरकारी अधिकारी फोनवर पैसे मागत नाही. अज्ञात कॉल, व्हिडिओ कॉल किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका. संशयास्पद कॉल आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या. दरम्यान, सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाढत्या सायबर फसवणुकीचा ट्रेंड
पिंपरी-चिंचवडसह राज्यात “सीबीआय अधिकारी”, “पोलिस अधिकारी”, “बँक अधिकारी” अशा नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. आरोपी आधी घाबरवतात आणि नंतर पैसे उकळतात. त्यामुळे OTP, बँक डिटेल्स किंवा पैशांची ट्रान्सफर करण्यापूर्वी खात्री करणे गरजेचे आहे.